Sunday, July 3, 2016

कळ


कळ ,कुठूनशी उठणारी
खोल खोल रुतणारी.
एकांताची सोबतीण
गर्दीतही एकांतात  लोटणारी
क्षणिक,हवीशी , नकोशी.
बहुतेकदा नकोशीच .
काळाची पुटं चढवूनही
नेमाने येणारी
डोळ्याच्या कडा ओलावणारी
भिजक्या कडा चुकवताना 
जिव्हारी वेदना नोंदवणारी
कितीशे हिशेब मांडणारी
हिशेब मांडता मांडता
काहीच शिल्लक नसणारी
शुन्याच्या भोवऱ्यात अजूनच गुरफटणारी
आणि मग त्यातच विरणारी
काळासोबत अजूनच गहिरी होणारी
अंतापर्यंत साथ देणारी , एकटी सोबतीण
म्हणूनच कदाचित आपलीशी वाटणारी ,कळ

@ज्योती पवार