Saturday, November 21, 2020

चाफा


मागच्या अंगणात चाफा होता . अगदी सहज चढता येता येयील असा . शिवाय त्यावर आरामात बसता येयील अशी एक अगदी आडवी फांदी होती . त्या फांदीवर बसून झाड हलवले आहे ,त्यालाच लोंबकळले आहे, त्याला झोके घेतले आहेत. आजीला रोजच परडीत फुले वेचुण आणून दिली आहेत . फुलांच्या पाच पाकळ्यांना भोक पाडून ,एक एक पाकळी उलटी करून ती फुलांच्या दांडयात मागून खोचयाच्या कि झाली अंघटी तयार . रोज पाच पाच अंघटया करून घालायच्या . कानात घालायच्या . कानात काही ते दांडे जात नसत मग नुसतीच फुले कानाच्या पाळीवर खोचायची . एक एक पाकळी काढूण ती पाच बोटाला (नखांना )चिकटवायच्या. चाफ्याच्या ,मोगऱ्याच्या कळ्या काढून पाण्यात टाकायच्या . बंद छत्री सारखी दिसणारी चाफ्याची कळी उलगडून बघायची ,उघडत नसे ती मग ती दोन बोटात धरून उगाच फिरवायची .मज्जा नुसती . असे होते चाफ्याचे माझे अनामिक नाते .
नंतर वाड्यातली मागची जागा एका चुलत आजोबांनी विकली . चाफा आणि असंख्य झाडे तिथून तोडली
आता तिथे एक इमारत उभी आहे . आता काहीच शिल्लक नाही तिथे मागच्या अंगणात .

Monday, July 30, 2018

अशीही दिवाळी

अशीही दिवाळी-१

माझ्या काकांच्या घराशेजारी पुर्वी एक कंडक्टर राहायचा. दोन छोट्या मुली आणि बायकोबरोबर राहायचा. त्याचे वडील ऐन दिवाळी दिवशी वारलेले. म्हणुन तो अजिबात दिवाळी साजरी करत नसे. फराळ, फटाके काहीही नाही. मुली बिचार्या गपचुप बसायच्या. आईकडे लाडु, चकली फटाक्यासाठी हट्ट करायच्या. हे कित्येक दिवाळीला असेच चालु होते. पण बायकोची नवर्यापुढे ब्र काढायची हिम्मत नव्हती. बिचारी कानकोंडी व्हायची. शेवटी काकींनी तिला दिवाळी का करत नाही विचारले. तेव्हा हे तिने सांगितलेच पण अजुन थोडे पुढे बोलली ते असे...हयाच्या आम्ही न पाहिलेल्या बापाचे दु:ख दर दिवाळीला मनवतो. मी आणि पोरी फक्त. मी फराळाचे ताट कोणाला नाही देणार मग मला कोण देणार? पण ह्याला मात्र लोक (स्टाफ)फराळाला बोलवतात. तो मस्त रोज दोन तीन ठिकाणी हादडुन येतो आणि पोरी आणि मला बाप मेल्याचं दु:ख साजरं करायला लावतो.

अशीही दिवाळी -२
मागच्या वर्षी मी बहिणीकडे गेले होते,ऐन दिवाळी दिवशी. स्वारगेट मध्ये अक्षरशा: उभा राह्यला जागा नव्हती. सातार पर्यंत काय रिर्झरवेशन करणार म्हणुन केले नव्हते . कशी बशी बस मिळाली. औंध एवढे प्रसिद्ध ( म्युझियम, यमाई देवी) असुनपण तिकडे जाणारी एस टी यायला एक तासापेक्षा जास्त अवधी होता. सर्व स्टॅन्ड रंगीबेरंगी कपड्यांनी आणि फराळाच्या डब्यांनी नटले होते. तोवर एक बाई जोरजोरात रडत, शिव्या देत फोन वर बोलत होती. काखेत बाळ, एका हाताला चार पाच वर्षाची छोटी पोर. बाळ, मुलगी आणि तिचे कपडेही चांगलेच होते. पण ती कसलीही पर्वा न करता रडत, भांडत, शिव्या देत होती. शिव्या अतिशय अर्वाच्य होत्या. अख्ख स्टॅड तिच्याकडे पाहत होतं. ती ज्या शिव्या देत होती त्यावरुन एवढच कळत होतं की तिचा नवरा कोठेतरी न सांगता गेला होता. दिवाळी दिवशीही तो आला नव्हता. बहुतेक तो तिच्याकडे परत कधीच येणार नव्हता.
आईचे रडणे पाहुन बाळ अजुनच जोरजोरात रडत होते. ती छोटी मात्र एक हात बाळाच्या डोक्यावर फिरवत होती आणि एका हाताने आईचा हात हळुवार चोळत होती. बाकी भरलेल्या स्टॅंडमधुन कोणाचीच हिम्मत नव्हती त्या बाईला सावर्णासाठी मदत करायची...


अशीही दिवाळी-३
माझ्याकडे येणारी मावशी दिवाळी दिवशी कामाला आली. मी बर्यापैकी काम केले होते. मी म्हणाले आज कशाला आला? आदल्या दिवशी तीने सुट्टी घेतली होती. म्हणाली काल बहीणीला गावाकडे जायचे होते त्याची तयारी. आता मी एकटीच, मोकळीच आहे.
मी: तुम्ही नाही गेला गावाकडे?
ती: नाही ओ , मी काय
करि गावाकडे जाऊन?
मी: का? मुले?
ती: नाहीत.
मी: नवरा?(काळया मन्यांचे लांब मंगळसुत्र आहे त्यांच्या गळयात. मावशी अतिशय देखणी, उंच गोरीपान आहे जेमतेम ३५-४०च्या आसपास. पण तिच्या चेहर्यावरचे हास्य जणु मावळलय.)
ती: तो कधीचा सोडुन गेलाय?
मी: कधी?कोठे?
ती: लग्न झाल्यावर लगेच गेला.
मी: परत आलाच नाही?
ती: २-४ वर्षाने लग्न करुन आला.
मी: तुम्हीही मग दुसरे करायचे ना, अजुनपण करु शकता.
ती: नाही , तेव्हा सर्व गावातले, आईवडील म्हणाले कर म्हणुन पण नाही केले. मनच उडाले.
मी: वडील करत होते तर का नाही केले?
ती: अहो , तो लग्न करुन मुलबाळ करुन आला. तीला माहेरी घालवुन मला न्यायला आला. वडील जा म्हणाले. मी नाही म्हणाले. खुप मारले मला वडीलांनी. बेशुद्ध पडले. मग वडील मारायचे थांबले. खुप सुंदर दिसत होते ना मी.त्यांना घोर. म्हणुन दुसरे करुन देत होते. माझ्या काळजीपोटी नाही. गावाकडे पोरगी घरात राहणे कमी पणाचे समजतात ना ओ. पण काय करणार. माझे मनच उडाले. दिवाळीला मी तिकडे जाऊन काय करणार? सर्व आपआपल्या मुलाबाळात , माझी कशाला तिथे अडचण.
मी: निशब्द
.

वसंत

संपला शिमगा , लागल्या झळा
मोगर्याचा सुवास , अंगणी दरवळला
कितीही भरला उरी, रितेपण कळेना
वैशाख वनव्यात , वाळ्याचा आसरा

ऊन्हाच्या झळा, जाळती जीवा
लाल पळस ओकतो ज्वाळा
निथळला पिंपळ, घालतो सडा
आईच्या माझ्या शेवया पापड्या

आला ग वसंत , फुलला झाडोरा
ढाळली पाने, फुटवा फुटला
रंग उधुळण, निसर्ग नटला
एवढ्या ऊन्हात, चाफा फुलला

@ ज्योती

Tuesday, August 16, 2016

हिशोब आयुष्याचा

द्यावा म्हणते हिशोब आयुष्याचा
दिल्या घेतल्या वेदनांचा
काढावा म्हणते उकरून पसारा
उरात कोंबल्या आठवणींचा
उसवावा म्हणते धागा धागा
उरल्या सुरल्या स्वप्नांचा
घ्यावा म्हणते एक एक घास
मनी धरलेल्या इच्छांचा
पहावा म्हणते परतून घाट
चढल्या उतरल्या वाटांचा
चढवावा वाटतो देह सरणावर
आयुष्य ओढून थकलेला

@ज्योती पवार

Sunday, July 3, 2016

कळ


कळ ,कुठूनशी उठणारी
खोल खोल रुतणारी.
एकांताची सोबतीण
गर्दीतही एकांतात  लोटणारी
क्षणिक,हवीशी , नकोशी.
बहुतेकदा नकोशीच .
काळाची पुटं चढवूनही
नेमाने येणारी
डोळ्याच्या कडा ओलावणारी
भिजक्या कडा चुकवताना 
जिव्हारी वेदना नोंदवणारी
कितीशे हिशेब मांडणारी
हिशेब मांडता मांडता
काहीच शिल्लक नसणारी
शुन्याच्या भोवऱ्यात अजूनच गुरफटणारी
आणि मग त्यातच विरणारी
काळासोबत अजूनच गहिरी होणारी
अंतापर्यंत साथ देणारी , एकटी सोबतीण
म्हणूनच कदाचित आपलीशी वाटणारी ,कळ

@ज्योती पवार


Wednesday, February 10, 2016

हादरे


आज एका मित्राला भेटायला जाणार होते ,म्हणाला सोनुला विचारून मुवीज ची लिस्ट करून घे मग मी तुला देतो कॉपी करून .मी बर म्हणाले ...
सोनुला विचारले ...तर सांगू लागली....
मी यादी वर पासून खालीपर्यंत पाहत होते ..सर्व इंग्लिश ..
मी म्हणाले --अग काय हे ...सर्व इंग्लिश ,एकसुद्धा हिंदी ,मराठी नाही ..काय हे ..तू पेपर पण फक्त इंग्लिशच वाचतेच ..
ती -मग ?
किती गोड आहे ग माझी मराठी , तुला फक्त वेस्टर्न कल्चर आवडायला लागले आहे ..आपली भारतीय संस्कृती ...
पुढचे बोलायच्या आत ...सोनू जी चालू झाली ...असे हादरे ...भूकंप ..
काय ग एवढे कौतुक करतेस ह्या भारतच ? काय चाललय इथे ? रोज एक बलात्कार ,बायकांना मारहाण ,मुलांना मारहाण,चायील्ड लेबर ,चायील्ड म्यारेज ,इथले लोक म्हणे इज्जतदार ..कशावरून ठरवतात ग ..तर फक्त कपड्यावरून ...
जन्मला घातल्यापासून मरेपर्यंत ..आपण काय खायचे ,काय घालायचे काय शिकायचे ,काय खेळायचे ,कोनात मिसळायचे ,कोणाबरोबर लग्न करायचे हे ठरवतात आई वडील ...स्वतच आयुष्य पूर्ण दुसरेच ठरवतात ..व्हाय ममा ? व्हाय ?
सर्व स्टेरिओ टायीप अटीट्युड ...सर्व घरातून च शिकवले जाते आणि द्यायचा दोष समाजाला ... का ग ? का आम्ही स्कर्ट घातला तरी पाहतात सर्व विचित्र नजरेने ..मुलांनी घातली हाफ प्यांट तर पाहते का ग त्यांच्याकडे कोणी असे विचित्र नजरेने ? मुली डॉल बरोबरच खेळतात ,मुलांनी गाड्याच खेळाव्यात ...किती जेन्डर डीस्क्रीमिनेशन...बाई मजूर एवढी स्यालरी ...माणूस एवढी काय हे ? मुलीचा जन्मा आदीच मृत्यू ..लडका आग्रा के पेटी ..लडकी -नाली का किडा ...
बर ते जावूदे -तुमची हिस्ट्री हेरीटेज पाहायला बोलावता ,आणि काय दाखवता ग फोर्ट वर तर प्लास्टिक ,गुटख्याची पाकीट ,दारूच्या बाटल्या ,कचरा ,घाण ,रस्त्यावरच्या थुन्क्या ..हेच ना ...लुटता त्या येणाऱ्याना
बर ते जावूदे ....इथले ट्राफिक ..रोज हजारो जन मोडतात ,तिकडे आहे का एकाची तरी बिशाद ट्राफिक चे रूल मोडण्याची?इथले सर्व भ्रष्ट ...क्यू इतने बडे बडे पेट है यहा के पुलिस लोगोंके ?क्यू लागी इतनी देर कसाब को फासी चढाने के लिये ..कैसे आया ओ अंदर? क्या कर रही थी हमारी नेव्ही ?नो वन कन्सर्न अबावुट सेफ्टी .कामचोर कुठले . हेच शिकवले जाते इथे .आपलं आपलं पाहून घ्यायचे .ओनेस्ती ,सेकुरीटी ह्या नुसत्या पुस्तकात शिकावाण्य्च्या गोष्टी ..हेच शिकवता तुम्ही ..
दुर्गा ,सरस्वती पार्वती नुसत्या पुजायला त्या हि दगडाच्या किवा मातीच्या ..खऱ्या नाही ..
आणि हो तुम्हा लोकांना बाहेर जॉब साठी बोलावतात ना ते तुम्ही खूप हुशार आहेत म्हणून नाही तर तुम्ही कमी पैशात काम करतात म्हणून ..
शेवटी रडायला लागली ..
मी रडू लागले ..लेक एवढी मोठी झाली म्हणून ,मार्क्स राहूदे पण शिक्षण अंगात भिनलय म्हणून ..
न राहवून विचारले ,कोठे आणि कधी शिकलीस हे सर्व ..
रडतच म्हणली ..शाळेत असतात हे सर्व विषय ..तुम्ही फक्त वाचता ...

Sunday, October 18, 2015

उगाच चिंता …

स्थळ काशीद बीच
मी प्रेक्षक
आमचा सर्व ग्रुप समुद्रात खेळतोय, मी बसलेय पाहत अथांग समुद्र . शेजारीच थोड्या अंतरावर दोन मुले आणि दोन मुली . त्यांच्यात चाललेल्या संवादाची मी मूक प्रेक्षक . दोन बाटल्या (दारूच्या असाव्यात ).
दोन मुलींना उद्देशून एक मुलगा -- एक सिप तू पी एक सिप हि पिल .
दुसरी मुलगी : अरे कुछ नही होता है तू पी .
तिसरा मुलगा : मै कुछ नही बोलुंगा
परत पहिला मुलगा :अरे पी ना , उसमे कुछ बुरी बात नाही है
दुसरी मुलगी :मै तो पिवूंगी तू एक सिप ले पहिले
परत पहिला मुलगा ,चल तू एक  सिप  ,ये एक सिप
चवथी मुलगी : एक सिप
ते तिघे :हुर्रे
परत पहिला मुलगा : चल अभी एक एक सिप पी के खतम करो तुम दोनो
परत पहिला मुलगा :तू इसकी गर्लफ्रेंड है ना तो चल एक किस दे इसको फिर जा
परत दुसरी मुलगी ,(पिवून )मै तो इसको किस करूंगी
चवथी मुलगी अजून दोन चार सिप घेवून -बॉयफ्रेंडला कीस करून
दोघी एक बाटली संपवून समुद्रात
हे दोघे अजून एक बाटली पित बाहेर किनाऱ्यावर
त्या दोघी पाण्यात .

असं पहिल्यांदा पिवून ती मुलगी बाहेर येयील का याची मला उगाच चिंता …