Sunday, October 18, 2015

उगाच चिंता …

स्थळ काशीद बीच
मी प्रेक्षक
आमचा सर्व ग्रुप समुद्रात खेळतोय, मी बसलेय पाहत अथांग समुद्र . शेजारीच थोड्या अंतरावर दोन मुले आणि दोन मुली . त्यांच्यात चाललेल्या संवादाची मी मूक प्रेक्षक . दोन बाटल्या (दारूच्या असाव्यात ).
दोन मुलींना उद्देशून एक मुलगा -- एक सिप तू पी एक सिप हि पिल .
दुसरी मुलगी : अरे कुछ नही होता है तू पी .
तिसरा मुलगा : मै कुछ नही बोलुंगा
परत पहिला मुलगा :अरे पी ना , उसमे कुछ बुरी बात नाही है
दुसरी मुलगी :मै तो पिवूंगी तू एक सिप ले पहिले
परत पहिला मुलगा ,चल तू एक  सिप  ,ये एक सिप
चवथी मुलगी : एक सिप
ते तिघे :हुर्रे
परत पहिला मुलगा : चल अभी एक एक सिप पी के खतम करो तुम दोनो
परत पहिला मुलगा :तू इसकी गर्लफ्रेंड है ना तो चल एक किस दे इसको फिर जा
परत दुसरी मुलगी ,(पिवून )मै तो इसको किस करूंगी
चवथी मुलगी अजून दोन चार सिप घेवून -बॉयफ्रेंडला कीस करून
दोघी एक बाटली संपवून समुद्रात
हे दोघे अजून एक बाटली पित बाहेर किनाऱ्यावर
त्या दोघी पाण्यात .

असं पहिल्यांदा पिवून ती मुलगी बाहेर येयील का याची मला उगाच चिंता … 
बाया २
   अनि तशी बुटकी पण दिसायला आणि बोलायला म्हणजे एकच नंबर . शिकली पण बीकॉम , कॉम्पुटर चे बेसिक कोर्स पण केलेले . घरची गरीब परिस्थिती . पण कधीही चेहऱ्यावर दिसून यायचे नाही इतकी खुश असायची . वडील वारले पण एकानेही चांगले स्थळ आणले नाही.  सर्व बिजवर स्थळे आणीत . तिच्यात एखाद्या मुलाला पटवायची हिम्मत नव्हती असे नाही पण ज्यांनी ज्यांनी तिच्यावर प्रेमाची नाटके केली ती फक्त तात्पुरती . फक्त वापर करून घेण्यासाठी .
   पण एखादे चांगले स्थळ आले किंवा कोणी आणले तर बाकी भावकीतले आमच्यात हे बसत नाहीत ते बसत नाहीत म्हणून नाकारायचे . कसेतरी एक मुलगा १२वी झालेलामुलगा  आला पास कि नापास तेही माहित नव्हते , तेंव्हा शेअर बाजार मध्ये मुंबईला सर्विसला आहे एवढीच माहिती . मुंबईत राहायचे म्हणजे किती पगार ? कोठे राहतो याची काहीच चौकशी केली नाही , आईने कर्ज काढून पोरीचे लग्न लावून दिले तसेही आईलाही फक्त लग्न उरकायचेच होते .
  शेअर बाजारात घोटाळा झाला आणि त्याची हजार बाराशेची नोकरीही गेली . बहिणीकडे राहायचा .
       नणंदेने पूर्ण उपयोग करून सर्विस गेल्यावर हिला गावाकडे हाकलले . मग तोपण गावाकडे आला . काहीच काम करायची सवय नाही . हिने कुठल्याशा पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम मिळवले . हा बेकारच . बेकारीत ह्याला काही उद्योग तर हवा ना ? मग दारू पिवू लागला . आता रोज दारू पिवून येतो आणि पोराला मारायला उठतो , कारण काय तर हे पोरग माझे नाही . संशय घेवून तिला मारतो , पोरालाही मारतो . रात्रभर पोराला खुशीत घेवून झोपते नाहीतर पोराला हा ठारच मारेल अशी भीती तिला वाटत असते. तिने धाडस करून घटस्फोटाचा निंर्णय घेत होती पण एकाही नातेवाईकाने तिला साथ दिली नाही . अगदी आईने सुद्धा . तू त्याला सोडतेस म्हणजे खरेच तुझे काहीतरी लफडे असेल असेच सर्व तिला म्हणतात . नवऱ्याच्या भयाने होती ती नोकरी सोडून दिली .
आता काहीच शिल्लक नाही , ना आत्मविश्वास , ना नोकरी.  आता दुसऱ्या नणंदेकडे घरगडी म्हणून राहते . ती नणंद पण हिच्यावर संशय घेते . आता लोक तिने नणंदेच्या नवऱ्याला कह्यात घेतले असे म्हणतात .

बाईला कोठेही जागा नाही हेच खरे .

बाया
   लक्ष्मी नवऱ्याने मारले म्हणून गावाला गेली खरी पण दोनच दिवसाने तिचा बाप तिला घेवून परत आला , दोन चार दिवस राहिला , लेकीच्या नान्न्यासाठी राहिला चार दिवस आणि जावयाला समजवुन परत गेला . पाचव्या दिवशी जावई लक्ष्मीचा पगार, स्वतःचा पगार घेवून मटका खेळायला गेला , अर्ध्या तासाने रिकाम्या हाताने परत आलालक्ष्मीने जाब विचारला , आता महिनाभर काय खायचे , पोराच्या शाळेची फी कशी भरायची ? पण तिच्या नवऱ्याकडे त्याचे उत्तर नव्हते . सर्व कपडे भरून अजून तिला मारून तो चालला गेला .
  आता लक्ष्मी रडत नाही , आई बापाला पण फोन करणार नाही म्हणाली , कोण नसतंय कुणाचे म्हणाली . माझं इथल्या पगारात भागतय म्हणाली . परत आलं तर मालकाला सांगून तेला हाकलून लावीन म्हणाली . कधी नव्हे ते मी सुखावले हे ऐकून ….


बाया 1

बाया

सकाळी सकाळी जोरजोरात कानडीत बोलल्याचा आवाज येत होता , पाठोपाठ पोरांच्या रडण्याचा . तसा तो आवाज नेहमीचाच आहे पण आज अजून जरा वेगळा कारण लक्ष्मीची पोरं आज रडत नव्हती तर तीच मोठमोठ्याने हंभरडा फोडून रडत होती पण कानाने ऐकण्यापेक्षा काहीच करू शकत नव्हते . तिला मारलेले फटक्यांचे सुद्धा आवाज ऐकू येत होते . प्रत्येक फटक्या सरशी अंगावर काटा येत होता , तिला किती लागले असेल ? प्रत्येक फटक्याने तिच्या मुलांचाही आवाज वाढायचा . हा आवाज सकाळी सकाळी येतोय म्हणजे लक्ष्मीचा नवरा दारू पिला नव्हता हे नक्कीच .

ऑफिसला जाताना लक्ष्मीचे डोळे सुजून टम्म झालेले पहिले . "सकाळी काय झाले ग ? " एवढेच विचारले तर तिचे उत्तर -

काय करू म्याडम , चार दिवस मला खूप ताप आलाय , काम होईना म्हणून ह्याला म्हणाले मला दवाखान्यात घेवून जा म्हणून एव्हढे मारत होता . पण मी आज गावाकडं जाणार आहे , पोराला बी शाळेत नाही लावले .

संपली कहाणी ? ताप संपला का नवीन परवड सुरु ?


काल लक्ष्मी सांगितल्याप्रमाणे गावाकडे  निघून गेली . रात्री पर्किंगमधल्या लाईट लागल्या नव्हत्या , जिन्यात पूर्ण अंधार होता . सकाळी पहाटे उठून तिचा खराटा वाजत नव्हता . सकाळी सव्वासाथला तिचे पार्किंग झाडून पुसून झालेले असते , पण आज तिचा नवरा साडेसाथ झाले तरी उठला नव्हता . मग कधी उठला काय माहित ? म्हणजे आजची तिची सर्व कामे त्याला करावी लागणार हे नक्कीच काल तिला मारून तिला जेवढा त्रास दिला त्याच्या कितीतरी पटीने ह्याला आज काम करावे लागणार ….

पण तो शांत निवांत, कारण एकच असावे - जावून जावून जाणार कोठे येयील चार दिवसाने परत हा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 

Sunday, October 11, 2015

सावध ह्या पुढच्या हाका !

बायकांच्या डोक्यात केमिकल लोचा नक्कीच असावा , खूप दिवस मनातच ठेवले पण आज सांगावेसेच वाटतेय. खुपदा मुलींचे असे असते  की एखाद्या मुलावर प्रेम जडते , मुलगी मनापासून करते , हळूहळू मुलगा तिला सांगायला लागतो - मला तू आवडतेस पण माझ्या घरच्यांना नाही पटणार . मग कोणीच सुखी होणार नसेल तर लग्न कशाला करायचे ? त्यापेक्षा आपण हे तुझ्या किंवा माझ्या  (कोणाचे आदी होईल तोपर्यंत) लग्नापर्यंत चालवत राहू , एकमेकांचे होवून राहू ,(तोपर्यंत मिळणारे फायदे मला मिळूदेत ) असे काहीतरी सांगून मुलींना झुलवत राहतात . मुलीही खुपदा अशी रिलेशन्स चालूच ठेवतात . मनाला समजावत नाहीत -- हे तात्पुरते आहे , तकलादू आहे  किंवा असे सर्व सांगणारी सिस्टीम आपल्याकडे नाहीच . हे मी सांगतीय कारण मी अशी बरीच उदाहरणे आजूबाजूला पाहते . मुलींचे मन मानायला तयारच नसते किंवा ध्यानात पण येत नाही त्यांच्या - ह्या सर्वात आपण स्वतःचे किती नुकसान करून घेतोय . इतक्या त्या मनाने गुंतलेल्या असतात . पुढे व्हायचे तेच  होते - मुले दुसरीशी लग्न करून सर्व विसरून जातात  , मुलीही दुसऱ्याशी लग्न करतात पण जुन्या आठवणींना कुरवाळत बसतात .

   माझा एक मित्र - एका  मुलीबरोबर त्याची तशी…  मैत्री . मैत्री का  काय ते ठावूक नाही पण … त्या मुलीची तो सर्व काळजी घेतो , घेवून फिरतो ,एकत्र  जेवतो , वाट पाहतो …  अजून बरेच काही असेलही पण लग्न -- नाही करणार . म्हणजे असेही नाही कि तो दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्न करणार नाही तर दुसऱ्या मुलीशी करणार पण हिच्याशी नाही …  का तर म्हणे त्याची आई फार कट्टर - जातीशी , मग लग्न नाही करू शकणार म्हणे … खुपदा सांगितले अरे आईला मनव की …. पण नाही - म्हणे ह्या लग्नाने जर कोणीच सुखी होणार नसेल तर कशाला करायचे . अरे हो पण मग तिला गुंतवून कशाला ठेवायचे ?( आणि तिने तरी का गुंतायचे? ), तिला तिचे आभाळ शोधू द्यावे ना -- पण नाही … ती माझीच असेल जोपर्यंत माझे किंवा तिचे लग्न होत नाही तोपर्यंत . तिची त्याच्याशी खूप इच्छा लग्न करण्याची पण त्याच्या घरी चालणार नाही … मग ही बिचारी प्रेम विसरू शकत नाही हे कारण सांगून स्वतःच्या मनाला फसवत राहिलीय . हे सर्व पचवण्यासाठी आहेच राधा कृष्णाचे उदाहरण . कृष्णाबरोबर म्हणे राधेचेच नाव घेतले जाते , रुक्मिणीचे नाहीच …  अरे पण राधेचे लक्षात ठेवले तुझे नाही हे कोण समजावणार ?

आपल्याकडे मुलींनी हे  सर्व पटवून देण्याची सिस्टीम नाही …मग दुःख करत बसायचे किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये जायचे , अभ्यास करिअर बंद . मुली खूप अभ्यास करतात चांगले मार्क्स पाडतात पण प्रेमवीराची लायकी नाही चांगले मार्क्स मिळत नाहीत मग ह्या त्याचे सर्व जर्नल्स , नोट्स साठी मदत करणार तोपर्यंत हे वीर सतत सोशल मिडीयावर पडीक (दुसऱ्या पोरींबरोबर गुलुगुलु गप्पा मारत )आणि ह्या राबणार …  स्वताची उन्नती रोखून, नेहमीच पडती बाजू मुलींची हेच जणू पटवून दिलेले असते त्यामुळे मुलीना बायकांना सवयच असते नमते घ्यायची .

आजकाल बायका -- ज्यांना घरात प्रेमाचे दोन चार शब्द मिळत नसतात त्याही अशा प्रेमविरासाठी वेड्या असतात , समोरचा पुरुष - मी तिला आधार देतोय ह्या गोंडस नावाखाली तिच्याकडून सर्व फायदे वसूल करत असतो  आणि ह्या बायका तो आपल्यावर किती प्रेम करतोय म्हणून …उतावळ्या असतात . जे बोलू नये ते बोलत असतात …  मागे हा वीर तिचे सर्व आंबट गोड मेसेज आपल्या मित्रांना फोरवर्ड करत असतो . बाईला ह्याचा पत्त्याच नसतो आणि वर सांगत असतो … बाईला अक्कल नको  हे सर्व करताना …? तिला पण ह्यात आनंद मिळतोय … मी तो तिला  देतोय… अरे हो पण चार चौघांना सांगून तो माणूस तिची चार माणसात इज्जत घालवतोय त्याचे काय ?

ह्या बायका मुली आडाणी नाहीतच - तर चांगल्या शिकल्या सावरलेल्या , कमावत्या  असले काहीच बिरुद चिटकवून त्यांना वेगळे करता येत नाही -- म्हणजे काहीतरी केमिकल लोचा आहे . कसा सावरावा तो? ? सावध ह्या पुढच्या हाका ऐकायला मदत करेल का ?


Monday, June 29, 2015

अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी

अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी
लेखिका : उमा त्रिलोक
अनुवाद : अनुराधा पुनर्वसू
खरे पाहता मी अमृता प्रीतम यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही किवा मला फार माहितीही नाही. फक्त ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे , अमृता प्रीतम एक भन्नाट ,निर्भीड आयुष्य जगल्या आणि इमरोज आणि त्यांचे प्रेम होते आणि अधून मधून फेसबुक वरील एखाद्या ग्रुपमधून चाललेल्या चर्चांमधून त्यांची माहिती मिळाली एवढेच .
पुस्तकजत्राच्या प्रदर्शनात हे पुस्तक मला दिसले आणि अंतरंगात पाहण्याची मला इच्छा झाली . वाचताना इमरोज चे अमृताजी वर किती प्रेम होते ते त्यातील त्यांच्या काही वाक्यामधून कळते . अमृताजी सुद्धा किती धाडसी असाव्यात ,एवढी इतक्या जुन्या काळी सुद्धा त्यांनी जे धाडस केले ते अफाट आहे . अमृताचे साहीर वर प्रेम असूनही ,भूतकाळ माहित असूनही ,कसलीही अपेक्षा न करता इमरोज त्यांच्या बरोबर राहिले म्हणजे त्यांचे किती निर्व्याज प्रेम होते ते दिसून येते .
नुसती कविता ऐकून घरात वेल लावणारे इमरोज ,चित्रकार इमरोज ,समंजस इमरोज अशी इमरोज ची बरीच वैशिष्टे समजतात पण त्यामानाने अमृताजींचे फार वैशिष्टे कळली नाहीत .
लेखिका त्यांना खूप उशिरा भेटल्यात म्हणूनच बहुतेक पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे खूप सारे अपेक्षित होते ते आले नाही . कसे भेटले ? पहिल्यांदा काय मनात आले , दोघांच्याही मनाच्या तळात जायला लेखिकेला जमले नाही असे मला वाटते .
बाकी दोघांचे एकमेकांवर अगदी निस्सीम प्रेम होते हेच फक्त कळते .
काही पंजाबी कविता जशाच्या तशा दिल्यात आणि नंतर अनुवाद हे थोडं बरे वाटले .

पण आता अमृता प्रीतम यांचे सर्व साहित्य नक्कीच वाचायला हवे ,अशी इच्छा निर्माण होते . एवढे काम हे पुस्तक नक्कीच करते . प्रेमकहाणी असूनही ह्या पुस्तकातून अश्लील , कोणत्याही गटाने वाचू नये असे काहीही आले नाही ,हे अतिशय चांगल्या पद्धतीने लेखिकेने साधले आहे .

ती


बोळक्यांचा संसार
मांडून अलवार
स्वप्नातला संसार
खेळीती ती


सुखाचा संसार
करण्या सुंदर
मायेचा आधार
सोडिते ती

सोडून माहेर
मनात काहूर
साज शृंगार
सजते ती

प्रीतीचे तुषार
मानून मधुर
भेटण्या आतुर
होतसे ती

गरम भाकर
करण्या तत्पर
हाताला चटके
सोसिते ती

प्रीतीचा पाझर
मायेचा निर्झर
प्रेमाची चादर
घालीते ती

सुखाचा सागर
करण्या सादर
दुःखाचे डोंगर
झेलीते ती

सोसून मार
दाबून प्रहार
कित्येक प्रहर
जागीते ती

वेदनेवर फुंकर
घालून हळुवार
वय म्हातारं
सोसिते ती
©ज्योती पवार

प्रारब्ध

प्रारब्ध
जन्म कोठे मृत्यू कोठे
नसते हातात काही
सुख छोटे दुःख मोठे
लिहिते सटवाई बाई

जात कोणती धर्म कोणता
ठरवते जन्माची आई
रूप कसले रंग कोणता
वांशिकता ठरवते सर्व काही
हीच शाळा तोच परिसर
ठरवतात बाप आई
काय शिकायचे कसे वागायचे
नसतेच हाती काही
स्वप्न कोणते ,दिशा कोणती
ठरवते गुणपत्रिका बाई
छंद कोणता उर्मी कोणती
दाबून घुसमट होई
प्रेम कोणते जोडीदार कोणता
निवडीचा हक्क आम्हा नाही
जात धर्म ,समाज भामटा
अन पत्रिका ठरवते सर्व काही
नोकरी कोणती धंदा कोणता
परिस्थिती ठरवते सर्व काही
लाथ मारून नशीब उजळता
अगदीच मोजके काही
जाळायचे कि पुरायचे
धर्म आडवा येई
उभ्या ह्या आयुष्याचे
बंध हाती नाही
असे हे प्रारब्ध
आयुष्य जाळीत जाई
©ज्योती पवार

गवत्या (मिलिंद बोकील )

गवत्या
मिलिंद बोकील
मौज प्रकाशन
गवत्या हा सह्याद्रीतला एक डोंगर .सोंडूर गावात हा डोंगर आहे . उगवणाऱ्या गवतावरून त्याचे गवत्या हे नाव . हा डोंगर जरी ह्या कथेचा नायक दाखवला असला तरी आनंद हा ह्या कथेचा खरा नायक आहे. तब्बल ४१० पानातून आनंद हा नायक आयुष्य निर्भेळ आनंदाने कसे जगायचे त्याहीपेक्षा आपण ते जगतच असतो हेच सांगत राहतो.
आनंदला आयुष्यात नक्की काय करायचे असते ते माहित नसते त्यामुळेच कोणतेही ध्येय न ठेवल्याने कोणत्याच गोष्टीत त्याचे मन रमत नसते . फक्त सरळमार्गी आयुष्य जगणे , नोकरी करणे ,त्यात मन नाही रमले की ती सोडून देणे असे उद्योग तो करत असतो. त्यामुळेच मुंबई सारख्या ठिकाणी राहून पण त्याचे मन ह्या गर्दीत रमत नसते . त्याच्यावर त्याच्या बालमैत्रीण अनुच्या प्रेमाचाही काही उपयोग होत नाही . अशा ह्या निराशेतून तो सोंडूर ह्या गावी गांधीच्या आदर्शानुसार चालणाऱ्या केंद्रात येतो .केंद्र चालवणारे घारपुरे , मुकणे , जी डी , शाळा , ब्रम्हे मास्तर . प्रत्येकाकडून त्याला काही नवीन शिकायला मिळते . त्या गावात त्याला बाज्या , उस्मान , जालिंदर , पक्या ,सुंदर ,प्रभाकर असे काही मित्र भेटतात . त्यांचे निरनिराळे उद्योग , मित्र प्रेम आणि त्यांचे काही प्रमाणातले उद्योग (फालतु ) आणि त्यामुळे मिळणारे ज्ञान .

जवळच असलेल्या देवधरचे सौंदर्य ,कोकणकडा , तिथले ठाकर आणि त्यांना इंजिन बसवून देण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न ह्याचे वर्णन .
सर्वात महत्वाचे काय असेल तर -ज्या पंडितरावांच्या सांगण्यावरून तो इकडे आलेला असतो त्यांचे व्यावहारिक तत्वज्ञान … आणि त्यांच्यामुळे ओळख झालेले गुरुजी त्यांचे जगण्याचे तत्वज्ञान एकदम मस्त आहे . जे समोर आहे ते करत राहायचे , त्यातून छोटासा का होईना आनंद मिळतोच आणि तो मिळवत राहायचा . मग अशा छोट्या छोट्या पोकळ्या मुजवून आनंद शोधायचा . म्हणजे मोठी पोकळी तयार होतच नाही . ह्या गुरुजींचे जगण्याचे तत्वज्ञान एकदम मस्त आहे हो . भरकटलेल्या जीवाला नक्कीच शांती मिळू शकते . ते खरच खूप छान आहे .
काही काही वर्णन रिपिट केल्यामुळे थोड बहुत कंटाळवाण होतं - जसे की झाडाला फळ मागणे ….
धुंडीमाळ ह्या पंडितरावांच्या प्राध्यापक मित्रामुळे आनंद पुढे सहज म्हणून एम ए करतो आणि त्यांच्याच एका अमेरिकन मित्रामुळे आनंदला पुढे युएस ला जायची संधी मिळते . सोंडूर सोडून जावे लागेल म्हणून होणारी घालमेल पण तरीही नवीन वाट धुंडाळण्यासाठी तो जाण्याचे ठरवतो .ह्या सर्व प्रवासात त्याला गवत्याचे सौंदर्य भुरळ घालते . त्याची निरनिराळी रूपे पाहून व त्यावर असणाऱ्या गुहेत तो आपली दुःख त्रास विसरून जातो .
आपल्याही आयुष्यात अशा छोट्या पोकळ्या असतातच , त्या बुजवण्याचे अनेक मार्ग आहेत . ह्यातील गुरुजींचे तत्वज्ञान आपल्यालाही ह्या पोकळ्या मुजावायला नक्कीच मदत करतील . न ठरवताही आयुष्य एका सुंदर किनाऱ्यावर नेता येते हेच तत्वज्ञान वाचायचे गवत्या मधून 

दुःखाचा अधिकार


उगा बसुनी मऊ गादीवर
अश्रू ढाळीत त्या मरणावर
आठवणींचा जागवत जागर
रडण्यास मजला वेळ नाही
कारण
हे वेड पांघरून झोपण्यास मजकडे गादीच नाही

नुसते खावून बसून कोपऱ्यात
ताट लोटून आयते जगण्यात
बसून बसून सांधे दुखण्यात
दुःख करण्यास मजला वेळ नाही
कारण
माझ्या घरात धान्याचा दाणाच शिल्लक नाही
होते नव्हते सर्व गेले
जबाबदारीचे ओझे झाले
काळ पाहून डोळे सुखले
मित्रमेळे निघून गेले
आसवे ढाळीत बसण्यास मजला सवड नाही
कारण
माझ्या लेकरांची हातातोंडाची गाठच पडणार नाही
नसे गोंजारणारे ते प्रेमळ हात
नाही उरला पातेल्यात भात
करावीच लागेल काही सुरवात
पैशाची माझ्याकडे दमडी नाही
कारण
दुःखाचा मला अधिकारच नाही
©ज्योती पवार

गाई ,म्हैशी ,डुकरे ,कुत्रे ,मांजरे आणि खड्डे-2

मागच्या दोन लेखात मी कुत्रा आणि म्हैशीबद्दल सांगितले .  आता गाय घेवू . आमच्या घरात गाय होतीच -जर्शी गाय .  आई मोठी बादली घेवूनच धार काढायची . दोन हातानी धार बादलीत पडे आणि चिळ चिळ असा आवाज येई ,मज्जा वाटे . एवढ्या मोठ्या बादलीत दुधाचा फेस वर आलेला बघून मजा यायची पण खरे दुखणे तर पुढे होते .
     हे दुध जरी जास्त असले तरी घरी वापरत नसत . कारण ते अगदी पातळ त्यामुळे चहा घट्ट होत नसे . पिण्यासाठी पण याचा वापर नसेच कारण ते पिवळसर दिसे आणि एक विचित्र वास पण येत असे . त्यामुळे सरळ मोठ्या किटलीत भरून डेअरी ला घातले जाई . आता घरात मीच मोठी मग ते डेरीत कोण घालणार ? मी होतेच . कितीही शाळेला उशीर झाला ,काही झाले तरी ती एवढी मोठी किटली वागवत त्या लांब चावडीवर असलेल्या डेरीत जावे लागे आणि किटली ह्या हातातली त्या हातात करून वैताग येई नुसता . वैताग होता नुसता . तिथे पोहचेपर्यंत मी एवढी वाकडी होवून चाले कि आता मी कायमची वाकडीच होणार काय असा भास होई . झाले नाही वाकडी ते सोडा पण अशी भीती वाटेच .
       तेव्हा मी सातवीत होते आणि स्कॉलरशिप च्या परीक्षेला बसले होते . शाळेच्या अगोदर त्याचा क्लास असे , पण दुध घातल्याशिवाय जाता येत नसे . आईला हजारदा सांगूनपण ती लवकर धार काढत नसे त्यामुळे क्लासला उशीर . मग मी उशिरा जाई आणि काही समजतच नसे . मग प्रश्न विचारले कि मला काही येतच नसे ,सगळे मग मला "ढ " च समजत असावे मग . त्याचं फार वाईट वाटे . दोनचारदा बोलून घेतल्यावर मी क्लास सोडला आणि' अर्थातच स्कॉलरशिप ची परीक्षा पण दिली नाही . अभ्यासातून सुटका झाली पण सल माझ्या कायम मनात राहिला .
 तेच पुढे एलिमेंटरीच्या क्लासचे झाले .मग तिलाही नाही बसता आले ,वैताग नुसता . मनातल्या मनात हजार शिव्या त्या गाई ला आणि घरातल्यांना देवून झाल्या .
अधेमध्ये वैरण घाल ,लागवडीच घमेले गाई समोर ठेव असली फुटकळ कामे करावी लागत , सगळ्यात वाईट म्हणजे कोणी आईबाई येवून सांगे ,"गवतर धरा आज "…. झाले ,आई सांगेच तेव्हा लक्ष ठेव जरा . कशावर लक्ष ठेवायच तर गाय कधी …. ? काय हे ? ह्यांचे सोवळे ओवळे होते पण माझी वाट लागते त्याचे काय ? सगळ्यात वाईट म्हणजे गाईला ठेवलेली लागवड शेजारी बांधलेली म्हैस खावू नये म्हणून काठी घेवून उभा राहणे . म्हैस काही ऐकत नसे आणि माझी नुसतीच धडपड … , आई मग रागवत असे तेवढे पण जमत नाही काय म्हणून ?

हा अजून एक -सनासुदीला गाईला नैवेद्य , हे एक प्रकरण माझ्यासाठी वैतागच . आया बाया नैवेद्य घेवून येणार ,गप घमेल्यात देवून जाणार नाहीत तर चला कि जरा मला गाईला पुजायचे आहे असे सांगणार . गाय मारल म्हणून चल ग तू . मग त्यांची साग्रसंगीत पूजा होईस्तोवर तिथे काठी घेवून थांबा . गाईच्या डोक्यालाच कुंकू लावल पाहिजे ,प्रदक्षिणा झाली पाहिजे पण गाईची किवा म्हशीची लाथ बसणार नाही ह्याची काळजी . पूजा गाईची ,श्रद्धा ह्यांची आणि डोकेदुखी माझी .
     नंतर ती गाई मेली आणि तेव्हाच माझी त्या किटली आणि दुधापासून सुटका झाली .

   सगळ्यात भारी म्हणजे आजकाल रस्त्यावर धरणे धरणाऱ्या गाई , किती मोठ्या कळपाने धरणे धरतात त्या . शांत पणे.  काय म्हणणे मागत असतील त्या? पण भीती वाटतेच . चुकून मधूनच आली तर ? आया बाया एवढ्या धार्मिक , प्लास्टिक च्या पिशवीत भरून उरले सुरले रस्त्यावर फेकणार . गाई ते खायला येणार . पूर्ण रस्त्यावर अडवणूक नुसती .
   सगळ्यात भारी किस्सा तर पुढेच आहे . नवीन नवीन गाडी शिकलेले ,इकडे तिकडे वळता सुद्धा येत नसे . एकदा ऑफिस वरून (दमन टू वापी )घरी येताना गाई पुढून पळत येत होती .रस्ता सुनसान .  मला काही सुचेचना . गाडी थांबवली पण कोठे जावू तेच कळेना . मी मध्येच थांबलेली बघून समोरून येणारा माणूस प्रश्नार्थक नजरेने पाहत होता , मी मधूनच ओरडले - गाय ssss , त्याने मागे पहिले आणि वेग वाढवून निघून गेला . आता ? आता नक्की गाय माझ्या अंगावर येणार म्हणून मी चक्क रस्त्याच्या खाली असलेल्या खड्ड्यात गाडी घातली आणि त्यावेळची थरथर -- अजूनपण जाणवतीय . पण गाय तशीच पुढे पळत निघून गेली आणि मी मुर्खासारखी गाडी खड्ड्यात घातली होती . पुढे गाडी काढताच येयीना रस्त्यावर . शेवटी गाडी तशीच ठेवून मी रस्त्यावर . कितीतरी वेळाने ओफिसमधलेच नरेंद्र पाटील आले , त्यांना सांगितले सर्व , मग त्यांनी गाडी काढून दिली आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमधला प्रत्येकजण माझ्याकडे येवून हसत होता . लगेच मुलींच्या ड्रायव्हिंग वरचे जोक … बिचाऱ्या सगळ्या गाडी चालवणाऱ्या  मुली त्यादिवशी माझ्यामुळे चेष्टेचा विषय झाल्या .
   इति गाय पुराण …  ३३ कोटी देवांचे काही दर्शन झाले नाही पण माझा ३३ कोटी वेळा अपमान मात्र झाला.

विंचुर्णीचे धडे- गौरी देशपांडे

विंचुर्णीचे  धडे
गौरी देशपांडे

आता आता पर्यंत मी गौरी देशपांडेंचे एकही पुस्तक वाचले नव्हते पण पहिले वाचले ते विंचुर्णीचे धडे . कदाचित आपण ज्या वातावरणात राहिलो ,वाढलो त्याच वातावरणातील साहित्य वाचलं कि भावते मनाला तसच काहीसं विंचुर्णीचे धडे वाचून वाटले . आजूबाजूला तशीच डिट्टो माणसे दिसतील . सगळ्यात जास्त आवडली ती गौरीची एकलेपणाची आस . शहरात राहणाऱ्या माणसांना खेडे फक्त चारच दिवस बरे वाटते पण नंतर कंटाळा येतो . पण तसे न होता ,असे एकटे तेही उजाड दुष्काळी भागात राहणे ,तिथेही आपली जगण्याची स्टायील न बदलणे .

एकलेपणाची आस लागली हृदया
अन दाट पसरली प्रसन्नतेची छाया !

वा असा एकटेपणाचा  सुंदर विचार , अनुभवावा असे वाटून गेले ,पेलवेल कि नाही माहित नाही पण स्पर्शून गेला नक्कीच .
सगळ्यात आवडली ती बिनधास्त गौरी . रिक्षावाल्या काकाला थोडा वेळ थांबायला सांगून रमची बाटली विकत घेणारी गौरी मला ग्रेटच वाटली , त्याही पुढे जावून "प्यायची लाज वाटत नाही  तर दाखवायची कशाला वाटेल ?" असे म्हणून ती बाटली हातातून घेवून जाणारी गौरी . आतून बाहेरून पारदर्शक . अजूनही दुकानासमोरून जातानाही भीती वाटणाऱ्या मला ,"गौरीच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या कशा असतील याची कल्पनाच आली ".
बहिण आणि तिचे मिस्टर यामुळे तिने विंचुर्णीचे घर बांधले खरे पण तिथल्या माणसांना आपलेसे करणे ,त्यांचे विचार बदलणे सोपे नव्हतेच ,नसतेच हेच सत्य शेवटी उमजून येते .  कारण सवयी बदलत नसतात . तिच्या स्वतःच्या तरी कुठे बदलल्या . पण तरीही लोकांना वागण्यातून बदल शिकवणारी गौरी खूपच आवडली .
उन्हातानात उभं राहून बांधलेलं घर ,त्याची मनाप्रमाणे केलेली बांधणी ,तिथल्या जनजीवनाशी केलेली तडजोड ,विंचुर्णीचा दुष्काळ , तिथले विंचू ,त्यांचे निरीक्षण , पाझर तलाव , शेळ्या मेंढ्या , त्यांची उस्तवारी मस्त आहे अगदी . धामण ,साप ,गोमा यांचा सहवास आणि त्याबरोबरच एकटे राहणे . एवढे देश विदेश फिरून पण असा सुख सोई नसलेल्या भागात येवून राहणारी ,तिथेच जास्त रमणारी गौरी , अफलातून अजब रसायन नक्कीच आहे असे वाटून जाते . वयाची वीस वर्षे खेड्यात राहून पण गावाकडे गेल्यावर तिथे थोड्या कमी असलेल्या सुख सुविधेवर आपण बोलतो याची कीवच वाटली मला हे पुस्तक वाचून .  लाईट च्या झगमगाट अनुभवून नंतर बारा तासाचे भारनियमन अनुभवने केवळ अशक्य पण एकलेपनाची आस असली कि सारे जमत असावे बहुधा .
तिथल्या मांजरा कुत्र्यांची इंग्लिश नावे मस्त आणि ती तशी का ठेवली ह्याचे किस्से तर अगदीच मस्त . नानी ,गोरख , तिथले निंबाळकर ,मुकुल ह्यांच्या कहाण्या तर मनाला विचार करायला भाग पडणाऱ्या .

प्रथम विंचुर्णीत राहायला आल्यावर आदर्शवादाचे रोमांटिक तारे ,नवलाईचे घर ,वावर ,सभोवतालचे अथांग क्षितीज ,समोर
सळसळणारा तलाव आणि त्यात डुंबनारी नाव ,सूर्योदय -सूर्यास्त ,लोकांचे भले करण्याचा आशावाद ह्याने हुरळून गेलेली गौरी नंतर त्यातून झालेल्या मनस्तापाबद्दल हुळहूळणारी गौरी . छोट्या छोटया गोष्टीसाठी लागणाऱ्या कष्टाची जाण आली पण जीव रमला तो तिथेच हे कबुल करणारी ,आपल्या परीने आनंद शोधणारी खूप आवडली मला आणि हे पुस्तकही .


भग्न

लावूनी असे वेड ,स्वप्ने ती पहिली
मोडून तीच स्वप्ने , भंगले हृदय माझे

दाखवून स्वप्ने मज , वाट माझी बांधिली
तुडवूनी तीच वाट , सालटले पाय माझे

चालून त्या वाटेवरी , आशा मी शोधिली
करुनी वाट काटेरी , रक्ताळले पाय माझे

धरून त्या आशेला , घरटी मी विणली
बांधून त्या घरट्याला , निवले मन माझे

राहून त्या घरटयात , प्रीती मी जपली
तोडून त्याच प्रीतीला , फुटले बांध माझे

जपून त्या आठवणी , रात माझी झरली
शोधून आधार रातीचा , भग्न मी जाहले


©ज्योती पवार

Thursday, June 25, 2015

फेसबुकच्या हस्ती


फेसबुकच्या ह्या  प्रसिद्ध हस्ती
भाषेवर यांचे प्रभुत्व असती

सतत कोणास देतील चिमटे
कुचाळक्या आणि रिकामे खटके

बाईच्या कपडयावर सतत नजर
नेत्र सुख घेताना नेहमीच हजर

भल्या भल्या बायांची यांना साथ
बाया आहेत यांच्याच खिशात

भाषेत यांच्या बिभस्त्स रस
बरेच  वाचतात चवीने खास

दाखवतात हे भलतेच हुशार
वेळ आली कि होतात पशार

धर्माचा यांवर आहे पगडा
दुसऱ्या धर्मास समजे बेगडा

चेले यांचे आहेत हजार
मखलाशी ती बेसुमार

आत छुपा भरलाय कार 
दुसऱ्यावर मागून वार

भरडतात हे दुसऱ्या
गोष्टी करून हसऱ्या

कंपूशाही देते साद
घोडदौड यांची आझाद


Thursday, May 21, 2015

ब , बळीचा

ब , बळीचा
राजन गवस
पॉप्युलर प्रकाशन
  ब  बळीचा ही कादंबरी नाहीच . हजारो शेतकऱ्यांचे जीवन , व्यथा , घालमेल , मरणप्राय जगणं ह्याची जिताजागता अनुभव आहे . छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय आटापिटा त्याला करावा लागतो तो शेतकरीच जाणे . लहरी हवामान , सावकारी पाश . कमी कमी होत चाललेली जमीन  आणि जगण्याची कसरत ह्यातून व्यक्त होते . शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात पण सरकारी नोकर त्या  कशा श्रीमंत शेतकऱ्यालाच मिळवून देतात आणि निर्लज्ज कोडगे तो लाभ कसा उठवतात ह्याचे हुबेहूब वर्णन आहे .
   कोल्हापूर भागातली भाषा हे ह्या कादंबरीचे बलस्थान . एक नंबर जमलीय . प्रत्येक वाक्यागणीस "झ" ने चालू होणाऱ्या शिव्या मात्र ह्यात आल्या नाहीत हे विशेष .
 ही एका भांड्याच्या दुकानदाराने सांगितलेली "कोणेकरी " ह्या त्याच्या मित्राची कथा आहे , कि तो हरवल्यानंतर त्याची शोधमोहीम आहे का ?, कोणेकऱ्या ने लिहिलेली  चित्रपट कथा आहे का ?, तो सांगत असलेली शेतकऱ्यांची व्यथा आहे का अजून काही ?
 असंख्य कथा, उपकथा , नोंदी , चित्रपट कथा , जोतीरावांना पत्रे असे सर्व काही ह्या कांदबरीत आहे . लेखक ह्यात आपल्याला गुंतवून ठेवतो . एकाचवेळी हजारो गुंते सोडवायचा हा प्रयत्न आहे . पण हा गुंता काही सुटत नाही उलट त्यातच आपण अडकून  जातो . त्यातून सुटका नाहीच .

जोतीरावांना पत्रे :
हा ह्यातील अतिशय मार्मिक पत्रे . ह्यात कोणेकरी  महात्मा फुल्यांना पत्र लिहित आहे आणि नकळतच तुम्ही शिक्षणाची दारे बहुजनांना खुली केली त्याचे काय परिणाम झालेत हे सुनावतो आहे . पूर्वी आणि अजूनसुद्धा बहुजन समाज ब्राम्हण समाजाला आपल्या अधोगतीसाठी जबाबदार धरत आलाय पण सर्व शिकून सवरून प्रत्येक माणूस कशी फक्त स्वताची प्रगती करत आहे ते सांगत आहे . हा फायदा उठवून घेण्यात कोणतीच जात मागे नाही .
  सरकारी शिपायापासून ते अधिकाऱ्या मार्फत कसे पैसे खाल्ले जातात आणि त्याचे पाप मार्जन हे अधिकारी कसे करून घेतात हे वाचून देव पाण्यातच बुडवावे वाटतात .
 ह्या पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्या त बायकाही कमी नाहीत . त्यासाठी दिलेले उदाहरण "सौदामिनी खुरकुले" (नावात काही साम्य दिसतंय का हो ?) ह्या तहसीलदार बाईचे उदाहरण एकदम मस्त. आता ह्या बाई कोणत्या पदावर पोहोचल्या असतील ?

चित्रपट पटकथा : दारूवाला आणि त्याची मैत्रिण मिळून कोणेकरी कडून एक चित्रपट कथा लिहून घेत आहेत . त्यातला नायक आडव्याप्पा हा शेतकरी , त्याची बायको तायव्वा , मुले -सुमी आणि केरु , शिवाय जिवबा दानावडे , तात्या पाटील ,आबा नरसाळे , संतू खवीस आणि अशा असंख्य पात्रांनी भरलेली ही कथा . शेती हि नायिका .कथा फिरते ती शेतीवर आणि त्यांच्या जगजीवनावर . ती घालमेल पोहचते . स्वतःलाही ह्या पात्रांचा एक हिस्सा व्हावेसे वाटते . गावाकडे , खेड्यात ज्यांनी आयुष्य काढले त्याला तर ह्यातून सुटका नाही . चित्रपट आणि खरे जीवन ह्यात हजारो मैलांचे अंतर आहे हेच सिध्द होत राहते

शेतातला बारकावे , शब्द (घात , टपणे , पाणी लावणे , भांगलन असे बरेच …) , कष्ट , गाव , परस्पर संबंध , नाती , शहरी आणि ग्रामीण अशी नात्यांची विभागणी ,अचानक आलेली दुखणी , सहकारी सोसायट्या …काय  काय सांगू ?

नोंदी :
कोणेकरी  आपल्या घरचे , स्वतःचे नोकरीतले , भांड्याच्या दुकानात बसून जे जे अनुभव जगतोय ते नोंद करून ठेवतोय . त्या नोंदीतून स्वतः सरकारी अधिकारी असूनही पैसे न खाता राहिल्याने कसा जगत आहे , नातेवाईक काय अपेक्षा करतात . अशी घालमेल नितांत सुंदर उतरलीय . त्याचे जंगलाविषयी ची ओढ , धनगरे , त्यांचे ज्ञान असे असंख्य गुंते  आणि त्यांचे  पैलू ह्यात आहेत .


पण ह्या सर्व गुंत्याना उत्तरे नाहीतच , फक्त आपण त्यात अडकायचे .  त्यात गुंतून ठेवायला लेखक आपल्याला भाग पडतो . ही घालमेल जशीच्या तशी उतरते आपल्यात . त्यातून सुटका नाही .

Wednesday, May 20, 2015

पानगळ

पिवळसर धुसर धुरकट
रुक्ष असोनि नसे कटकट

हिरवाईचा नसे मागमूस
 तरीही रूप दिसते राजस

जीवास असते धाकधूक
पर्णसंभार अगदीच तुरळक

सृष्टी चे  हे चक्र मानून 
सहतो आम्ही हे जीवन

नाही तक्रार अन  किरकिर
होता सुरु ऋतु शिशिर 

आजी आजोबा

शनिवार , निवांत कामे आटपून पुस्तक वाचत बसले होते . तोपर्यंत काही तरी गडबड गोंधळ बाहेर चालू असल्याचे ऐकले  म्हणून बाहेर डोकावले . तर दोन तीन माणसे समोरच्या आजोबाना धरून बाहेर आणत होती . आजोबा नीट स्लीपर ही घालू शकत नव्हते . कसेतरी एकाने स्लीपर त्यांच्या पायात चढवले . आजी मागून एक एक सूचना करत होत्या . आठ दिवस झाले चक्कर मारते आहे . ज्या दिवसापासून हा त्रास चालू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेवून गेले होते . पण काही फरकच नाही . आता त्यांना अजिबात चालता येईना . बाथरुमला पण जाता येईना . रवीवारी पडले .
आजी आजोबांना जीना उतरायला चालू करोपर्यंत ह्या सूचना देत होत्या .

मी खाली येवू काय असे विचारत होत्या . समोरच्या माणसाने नको म्हणे पर्यंत ह्या सूचना चालू होत्या .माणसे जीना  उतरून खाली गेल्यावर आजी ग्यालरीत उभ्या राहून आजोबा कसे गाडीत चढतात त्या पाहत होत्या . मी तेव्हापासून त्यांच्याच बरोबर होते .

गाडी गेल्यावर मला त्यांनी पूर्ण पुन्हा सर्व सांगितले . म्हणाल्या दुपारी दोनपासून सर्वाना फोन लावतेय .तेव्हा आता सातपर्यंत हे लोक जमा झाले . मला तशी बटणे दाबता येत नाहीत , हात थरथरतात . आजोबाच फोन लावतात , पण त्यांना जमेना म्हणून एवढा वेळ . पाहुणे म्हणजे सुनेच्या बहीणीचा मुलगा आणि तिच्या आत्या बहिणीचा नवरा आहे असे सांगितले .
आजींची थरथर वाढली होती . घशाला कोरड पडत होती . मला काय करावे ते सुचेना . मग न राहवून आजींना विचारले . मुलांच्या जवळ का राहत नाही . आजी म्हणाल्या काय करणार -एक मुलगा तिकडे अमेरिकेत , जावून त्याला २० वर्षे झाली . वर्षातून एकदा येवून सर्व सोय करून जातो . दर रविवारी फोन करतो .
मग मी म्हणले , दुसरा मुलगा . आजी कचरतच म्हणाल्या . दुसऱ्याकडे जावून इथे पुण्यात राहिले असते पण तो कधीतरीच येतो नाहीतर गावाकडे असतो . बहुधा त्यांची सून आणि नातू राहत असावी इथे पण पुढे काही बोलल्या नाहीत .

पुढे मग म्हणाल्या , मला बिपी,डायबेटीस , अञ्जिओप्लास्टी  झालीय . मोठ्या मुलाचा चांगला फ्ल्याट आहे इथे तीन बी एच के चा . पण आम्हा दोघांना एवढा मोठा काय करायचा म्हणून तो भाड्याने दिला आणि इथे २ बी एच के भाडयाने घेतला . नेहमीच्या रिक्षा वाल्याला फोन करतो . मग तो नेतो आम्हाला दवाखान्यात . पैसे जातात पण फोन केल्यावर तो येतो. आज केला होता पण तो कोठे बाहेर गेला होता .

मुलगा जेनेटिक सायंटीस्ट आहे . त्याची बायकोही तिकडे सर्विस करते . नातू  आता पी एच डी करतोय , एक गावाकडे आजोबांनी जो जमीन जुमला घेतलाय तो धाकटा  मुलगा सांभाळतो .

एकूण काय तर सदया आजोबा अद्मित केले तर त्यांच्या जवळ कोणी नाही . आजी आजोबाना व्हिसाही मिळत नाही . कारण त्यांचे वय जास्त आहे. धाकटा मुलगा गावाकडे राहतो त्यामुळे दवाखान्याच्या सोयी नाहीत . दोघाही मुलांना मुलगी नाही . नाहीतर बिचारी इथे आजी आजोबांना सोबत राहिली असती .

आजी हताशपणे म्हणाल्या , सर्व असून काही उपयोग नाही . एखादी मुलगी असती तर चार दिवस माहेरला येवून राहिली असती . चटक्यात सोनू म्हणाली मी तुम्हाला फोनचे नंबर लावून देईन . चहा पाणी गरम करायचे असेल तर करून देयीन . आजी डोंट वरी . मी घरी असले कि तुम्ही बिनधास्त बेल मारा . मी तुम्हाला पेपर वाचून दाखविण . फोन लावून देयीन .चहा करून देयीन . डबा तर तुमचा येतोच .

आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले . थरथर बंद झाली . मग म्हणाल्या जा तुम्ही घरी , स्वयंपाक करा ग़रज लागेल तर बोलवेन .


पण अशा आजीआजोबांनी करायचे काय ?

अगं आई अगं आई



नकोच लिहू अशा रडव्या कविता
नकोच मांडूस स्त्रीत्वाच्या व्यथा
नकोच करूस स्त्रीत्वाचा बाऊ
नकोच अशी मागे मागे  राहु


अगं आई अगं आई
नकोच शोधू जग काय म्हणेल
नकोच शोधू मी काय करेन
नकोच मांडूस व्यर्थ चिंता
नकोस चिंतूस कशी जळेल चिता

अगं आई अगं आई
उठ अशी ,जशा उठल्या ज्वाला
लिहि असे, जे जगतील साऱ्या स्त्रिया
जग अशी , दुःखालाही वाटेल हेवा
रहा अशी , रोजच आनंदाचा ठेवा 

अगं आई अगं आई
बघ असे , सुंदर  निसर्गाचा कुंचला
पळ अशी ,कमीच पडावी हरणाची चपळता
खा अशी , रोजच सुखाचा मेवा
दिस अशी , अप्सराही करतील हेवा


Sunday, May 17, 2015

वनवास


लेखक : प्रकाश संत .
   अमलताश (सुप्रिया दीक्षित ) वाचून झाल्यानंतर ओढ लागली ते म्हणजे "वनवास " वाचण्याची . कारण अमलताश मध्येच "लंप्या" ची तोंडओळख झाली होती . मग त्याचे भावविश्व जाणण्याचा ध्यास लागला  आणि वनवास वाचू लागले .
 वनवास हा खरे तर कथासंग्रह,पण  कथांमध्ये विभागले नसते तर कांदबरी हि होवू शकली असती असे वाटते . तसं पाहायला गेले तर हे पुस्तक म्हणजे लहान मुलांसाठी लिहिले आहे असे वाटते पण तसे  नाही . हे पुस्तक कोणीही कोणत्याही वयात वाचू शकते . लहानपणी ते वेगळ्याच दृष्टीने वाचू शकले असते म्हणून ते अगोदर का मिळाले नाही असे वाटून राहिले . पण आताही वाचून मी माझे बालपण आठवून झाले ,पुन्हा त्यात रमावेसे वाटले आणि खरच मी मनापासून एन्जोय केले . ह्यात पोंगडावस्था चालू असताना मुलांच्या मनात काय भाव असतात ,ते किती निरागस असतात , छोटी मुलं किती निरागसतेने भरलेली असतात . त्यांच्या मनातले भाव अगदी सुंदर टिपले आहेत ह्यात . आई-बाबां पासून दूर म्हणजे आजोळी राहिल्यावर ,आई बाबांची आठवण येवून वाटणारी रुखरुख , छोट्या  भावंडाची  येणारी आठवण , आजी आजोबांचा फिरणारा मायेचा हाथ . उच्च शिक्षित आणि समंजस आजोबांची नातवाला शिकवण्याची धडपड  एकदम मस्त .
  ह्यातील कन्नड भाषेचा प्रभाव आणि त्यातून झालेली विनोद निर्मिती तर अगदी अफलातून आहे . मला अशी काही नावे इथे देण्याचा मोह होतोच आहे .
"जंब्या कट्टमोळ , कनबार्ग्या गंग्या , वंटमुरीकर देसायांचा बोका , टुकन्या , परग्या , हत्तनगडी आणि खूप सारी नावे ."
तसेच ह्यातील असणारी आकड्यांची मजा - उदाहरणार्थ -"दहा गुणिले दहा भागिले शंभर , एक्काहत्तर गोष्टी . एकतीस जाडजूड खिळे ,वट्टात तेरा , एकशे सत्तावीस प्रश्न , तेविशेलक्ष , एकोणीसशे साठ "--असे हे बेस्टच आकडे वापरले आहेत त्यातून होणारा विनोद अगदी अफलातून .
  मुलांना निसर्गाबद्दल असणारे प्रेम , खेळण्याची असणारी अनावर ओढ , विनाकारण असणारी भीती --ह्याचे वर्णन अगदी मस्त .
 मुलांना मुलींच्या बद्दल असणारे त्यावयातील वासनारहित आकर्षण . त्यासाठी वापरलेले "सुमीचे" पात्र एकदम मनाला भिडते .

सर्वात छान म्हणजे "आजी आजोबा "--दुधाच्या साई सारखे प्रेम काय असते ते अगदी जाणवते .
"वनवास" हे दिलेले नावहि अगदी सार्थक आहे . लहानपणी ज्या गोष्टींचा कंटाळा असतो ,नकोशा वाटतात,वनवास वाटतो त्याच गोष्टी मोठेपणी वाचताना तोच वनवास बरा होता आजच्या ह्या "धकाधकीचा,धावपळीच्या ,जगण्याचे हिशोब द्यावे लागणाऱ्या  " वनवासापेक्षा कितीतरी छान आहे असे वाटते .
 ह्यातल्या  लंप्या च्या भाव विश्वातल्या कितीतरी गोष्टी आपण अनुभवल्या आहेत आणि आपण त्याची आठवण काढतो हेच या पुस्तकाचे यश म्हणायला हवे .
शाळा ,आजोळ ,मित्र -मैत्रिणी , छोटी भावंडं अगदी जशीच्या तशी उभी राहतात .

 हे पुस्तक वाचले ,अंमळ उशीराच वाचले तरीही का वाचले हे शेअर करावेसे वाटते म्हणून -
"ओझं ,चक्र ,भेट ,मैत्री " ह्या कथा खूप आवडल्या .

"आदम ह्या कथेतील मजकूर खूप आवडला पण त्याचा आदम शी जोडलेला संबध फारसा काही आवडला नाही

" विजय तरवडे" यांनी  नंदिनी देसाई यांचा "अमलताश " ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू शेअर केला होता ,तो वाचून प्रकाश संताच्या ह्या लंप्या बद्दल मनात उस्तुकता चाळवली आणि मग राज जैन यांच्याकडून मी "वनवास " हे पुस्तक मागवले आणि सुंदर अनुभव गाठीशी जमा झाला . त्याबद्दल ह्या तिघांचेही आभार .


Sunday, May 3, 2015

बहर 2


आईच्या घरासमोरच एक वड आहे . लाल बुंद छोट्या छोट्या फळांनी तो मागे लगडला होता . पटकन जावून खाऊन टाकावी अशी ती फळे . डोळ्याचे पारणे फिटावे असे ते सौंदर्य . पण तेव्हा हे लिहायचे राहून गेले .
अजून एक , मी राहते त्या बिल्डींगच्या मागे रस्ता आहे आणि घरे . तिथल्या एका घरात समोर छोटीशी , अगदी पाच बाय एक एवढीच जागेत झाडे लावलीत . अगदी रस्त्यातच . पण एवढी छान रातराणी फुलली होती , रात्री मंद सुवास यायचा . आख्खं झाड कळ्यांनी लगडले होते . आता रोज खूप छान सुवास येणार म्हणून खूप खुशीत होते पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी आले आणि आख्खं झाडच तोडून टाकले होते आणि ती छोटीशी बाग बोडकी झाली . असा फुललेला बहर , तोडू कसा वाटला असेल त्या माणसांना . हळहळले माझे मन . माझे जावूदे . एवढे दिवस वाट पाहून स्वतःच्या फुलांना स्वतासकट मुळापासून तुटताना काय काय वाटले असेल त्या रातराणीला . माणसाचा स्वार्थी घाव कोठे पडेल काहीच सांगता येत नाही . निसर्ग असा बहर अगदी मनापासून उपभोगतो . माणसाला काहीच मनापासून उपभोगता येत नाही .
अजून एक चाफा गावाकडून येताना शेतात पहिला . निष्पर्ण झालेला चाफा फुलानी अक्षरशः लगडला होता . फुलांना फुलवण्यासाठी त्यांना पानांची गरज नव्हती , सृष्टीचे चक्र मानून पानगळ झेलतात पण फुलतात ,गंधित करतात आसमंत . कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात बदल नसतोच. … किती शिकण्यासारख आहे निसर्गाकडून .
अजून कोणती कोणती फुले फ़ुललित . बोगनवेली तर अक्षरश: उधळण करत आहेत रंगांची . पूर्वी नव्हत्या काही त्यांच्यात एवढे रंग . पण शेजारच्या झाडाबरोबर क्रॉस ब्रीडिंग करून त्यांना एवढे रंग आलेत … माणूस तर माणसामाणसात जातीपातीच्या तट्टाणे लावून बसलाय .
आंब्याचा फिकट पिवळा मोहर मोहरलाय , त्याचा सुगंध अहाहा . अशीच शेवगा , कडुलिंब फिकट पिवळ्या रंगाची .
मोगराही तुरकाटी होतो पण फुलतो ह्याच काळात . मदनबाण म्हणतात त्याला लोक … एवढा सुगंध .मदनबाण नाव सार्थ करतो .
गुलाबी रंगाची किती फुले फुलली आहेत . फिकट गुलाबी रंगापासून गडद गुलालासारखे रंग आहेत .पण नावे काही माहित नाहीत त्यांची . लहानपणी काळा भोवरा खेळायचा तो तेवढा ओळखता आला . फिकट गुलाबी फुले आणि निष्पर्ण झाड . असेच भोवरया सारखे अजून एक झाड ,त्याला नारंगी फ़ुले. काही झाडांना अशी गुलाबी फुले आहेत ज्यांच्या पाकळ्या केसासारख्या आहेत . मधेच पिवळा आणि कडेने गुलाबी केसासारख्या रेषा .
अगदी डार्क पिवळी फुले जिच्या कळ्या आम्ही काढून टच टच वाजवत होतो पण नाव नाही माहित . अगदी बिट्ट्या पण पिवळ्या फुलांनी लागडलयात .
फिकट जांभळ्या रंगाची पण फुले गुलमोहरासारख्या झाडाला आलीत . गुलमोहराचा बहर तर काय वर्णावा . आख्खे झाडच केशरी.
अगदी आपला लाडका क्रिसमस ट्री ही खास राणी रंगाच्या उलट्या लोंबनाऱ्या फुलांनी लगडलाय .

अजून परवा काकीच्या माहेरी गेले होते तेव्हा मिरीचे झाड पहिले . काळ्या मिऱ्या झाडाला एवढ्या सुंदर दिसतात . आदि त्यांचे हिरवे घड लागतात , नंतर पिकताना मिरचीच्या लाल कलरचे घड होतात. एवढे सुंदर दिसतात . मस्त .
एवढ्यावरून -- निसर्ग बहरलाय हो…. एवढ्या उन्हाच्या झळा सोसून , निष्पर्ण होवूनही फुलांचे देखणेपण मिरवतोय . गळलेल्या पानांची ना खंत करतोय ना उन्हाच्या झळा लागतात म्हणून कुरकुर करतोय . तर अशीच बहर आपल्याही आयुष्यात येवुदे .

Thursday, April 30, 2015

बहर १

तीन दिवसाचा विकेंड होता पण वरच्यांना आमच्या सुखाचा हा बहर  कधी बघवतच नाही आणि शनिवारी प्रोजेक्ट रिलीज करावे लागले … करणार काय झकत काम केले सुट्टी दिवशी . एवढी धावपळ करून होळी नळी साजरी करायची म्हणून आणि लेक आईकडे सुट्टीला गेलीय म्हणून रविवारी आईकडे . रविवारी यायचे ठरवले पण लेकीची डिमांड -- २४ तास तरी काढ माझ्याजवळ ….लेकीच्या ह्या आग्रहाच्या बहरावर मान तुकवून …  पुन्हा रात्रीच्या आणि सुट्टीच्या झोपेच्या बहराला कात्री लावून चार वाजता उठून , आवरून  भावाला उठवून थंडीत साडे पाचला पेठनाका गाठला . एक जीपवाला आला , सर्व पुरुष त्यात चढले , भावाला चौकशी कर म्हणाले . तो गाडीवाला म्हणतोय , सर्व जेन्ट्स आहेत हो , मग एकच लेडीज नको . असुदे बाबा म्हणाले . मग गाडी आली --मिरज नाशिक . शिवाजीनगर पर्यंत जाणार म्हणून आणि साताऱ्यात जाणार नाही माझ्या आनंदाला खूपच बहर आला , आता ऑफिस ला वेळेत पोहचणार  आणि अप्रेझल ची मिटिंग गाठता येणार म्हणून कोण कौतुक . पण नंतर कंडेक्टर ने गाडीला सुपर फास्ट ते जनता गाडी बनवली . सातारा सोडून प्रत्येक हायवे वरच्या गावात बस थांबली . १५ मिनिटे फ्रेश होण्यासाठी थांबली …
असुदे म्हणाले -- ड्रायवर फास्ट चालवतोय --- पुण्यात ९ वाजता एन्ट्री ,स्वारगेट ला पोहचायला १० … हाय रे ट्राफिक चा बहर , शिवाजीनगरला पोहचायला साडे दहा … घरी पोहचायला ११ आणि कंपनीत उशीर नेहमीसारखाच …

पण गर्दीच्या ,ट्राफिक च्या बहरपेक्षा पूर्ण गाडीतून रस्त्यावर विविध फुलांचे जे बहर पहिले त्यावर उद्या … 

Tuesday, April 28, 2015

आठवणींचा हिंदोळा



होतास जेव्हा मिठीत
वचने हजार दिलीस
सुटली जेव्हा मिठी
मोडून सर्व गेलास

कशास खोटया शपथा
गोड शब्दांच्या ह्या बाता
कळते जरी मनाला
तरीही सुटतोच ताबा

असाच हा भुलय्या
भूलावितो मनाला
झुलवितो तनाला

शेवटी फक्त आठवणींचा हिंदोळा

Monday, April 27, 2015

गाई ,म्हैशी ,डुकरे ,कुत्रे ,मांजरे आणि खड्डे



   गाई ,म्हैशी ,डुकरे ,कुत्रे हे सजीव आणि खड्डे मध्ये आले कि काय जीवाचे पाणी पाणी होते ते त्यावेळीच ठावूक . अगदी आज सुद्धा रस्त्याने गाडी चालवताना ह्यांची फौज मध्ये आली कि झाले --जे व्हायचे ते होतेच , तोंडचे पाणीच पळून गेले म्हणून समजा . माझ्या तर जीवाला नुसता घोरच लागतो . अगदी लांबून म्हणजे पाच सहाशे मीटर वरून जरी मला हे दिसले कि झाले माझ्या गाडीचा स्पीड आलाच दहावर . चांगली गाडी धावत असताना ,मागच्याला ओव्हरटेक केले असताना ह्या बाईला मध्येच गाडी स्लो करायला काय झाले म्हणून मागचा अचंबित होत असणार हे अगदी नक्की . हा ,तर काय एवढे कारण भिण्याचे . कुत्र गाडीच्या आडवं येवून आमचे बंधुराज चांगलेच पडले होते , कसं आडवं आलं कुत्रं हे काही बंधुराजांना सांगता येयीना --शेवटी मीच कुत्र्याला आडवा आलो आणि असा हॉस्पिटलात आडवा झालो एवढेच सांगत होते . तसेच अगदी बहिणाबाई कुत्रा गाडीच्या आडवा आला म्हणून पडल्या होत्या आणि जे काही व्हायचे ते झालेच . चांगले लग्न ठरून फक्त दोनच दिवस झाले असतील, मग फोनवर बोलण्याच्या नादात (होणाऱ्या नवऱ्याबरोबर ) का अजून काही --ते माहित नाही पण कुत्रं आडवं आलं आणि बहिणाबाई पडली . चांगला गुडघा ,हनुवटी,कोपरे फुटले होते आणि गाल सोलतुन लाल झाले होते . लाजून लाजून लाल होण्याचे मात्र टळले तेव्हा . अजून एक मित्र -रात्री उशिरा घरी चालला होता तर कुत्र्यांची जत्रा अक्षरशा: मागे लागली  आणि मग त्याला चांगलाच चेव आला आणि मग सरळ बाईकवरून उतरून दगड घेतला बाबाने . मस्त भिरकावला … एकाला लागला पण बाकीचे सैन्य जे काही चवताळून उटले की … पळता भुई थोडी झाली आणि अशी काही गाडी स्लीप झाली कि पहिला मोठा नाला आणि नंतर हॉस्पिटलच गाठावे लागले .
   माझा स्वतःचा अनुभव तर काय सांगू -- मस्त गावाकडे गेले होते ,तर आईचे घर आहे गावाबाहेर म्हणजे शेतात म्हणा ना आणि वाडा आहे गावात . तर चांगले २ -३ किलोमीटर अंतर . आईचे घराशेजारी ,म्हणजे थोडा अंतर आहे,तिथे एक धाबा आहे . मग काय नुसता मांसाहार जेवायला दहा बारा तरी कुत्री तिथे आहेत . गावात गेले होथे वाड्यात . परत येताना आय टी आय च्या स्टोप समोर उतरले . आता पक्की पुणेकर झाल्याने मस्त रुमाल बांधला होता.सर्व नाक कान ,चेहरा झाकून ,नुसते डोळेच उघडे पण … मग काय ह्या कुत्र्यांना वाटले असेल बहुधा --आला अतिरेकी   . झाली यांची झुंड माझ्या मागे अशी काही लागली कि बापरे . मी बिचारी बापडी ,"हाड sss हाड ssss " . घशाला नुसती कोरड पडली पण कुत्रे काय हलायचे नाव घेयीनात . आता मला फाडून खाणार असे वाटले पण रुमाल काही काढायचे सुचले नाही . कुत्र्यांचा आवाज ऐकून आय टी आय मधला एक माणूस बाहेर आला … त्याने कुत्र्यांना हाकलले आणि म्हणाला, "रुमाल सोडा आदि !". हाय रे कर्मा -- काढला रुमाल . घामाने नुसती डबडबले . थोडेच पुढे गेले कि परत भुंकू लागले . शेवटी एस टी थांबली . तोपर्यंत आमचा टायगर आला (भावाने पाळलेला कुत्रा ), त्याने मग सगळ्यांवर भुंकले आणि फौज पळाली . त्याने तंबी दिली असेल बहुदा , का शिव्या हासडल्या कोणास ठावूक -- बहुतेक असे असेल --"ताईसाहेब आहेत आमच्या ,चालते व्हा हरामखोरानो … " , तोपर्यंत टायगर का भुंकतोय म्हणून आई,काकी ,आजी ,अण्णा बाहेर आले . एवढ्या वेळ भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाजच आला नसेल बहुतेक साऱ्या घरातल्यांना ,नशीब टायगर चा तरी आला … " माझी अवस्था पाहून आई धाबेवाल्याला शिव्या घालायला लागली … शेवटी सर्व किस्सा आणि रुमालाचा पराक्रम ऐकून आई मलाच म्हणाली ,"नाही ती थेरं करायची , हि सगळी तुमच्या पुण्यात कर बाई ,तिकडच्या कुत्र्यांना सवय असल . "

  झाले आता गावाकडे रुमाल घेवून जायचेच बंद केले आहे . इति कुत्रा पारायण . पण बाकी प्राण्यांनी  पण मला बरेच पिडलय ते पुढच्या लेखात …

 मागच्या लेखात कुत्र्याबद्दल सांगितले , अजून काही सांगतेच . आमचा टायगर गाडीखाली येवून मेला पण त्याला आमच्या घरच्यांनी साग्रसंगीत पुरला , त्याचे मेल्यानंतर चे सर्व विधी केले , नैवेद्याला त्याच्या आवडीचा टोम्याटो ,मटण आणि बरेच काही काही ठेवले होते ,माझा चुलत भाऊ एक दिवस पुण्याला न येता कंपनीला दांडी मारून राहिला होता , माझ्यासमोर फोनवर रडला होता ,घरी गेले तेव्हा कावळ्याने पटकन "टोम्याटो " च उचलला हे काकीनी घरी गेल्यावर मला सांगितले .

नुसत्या तेवढ्यावरच हे कुत्रा पुराण नाही तर पुन्हा घरात दोन कुत्री त्यांनी पाळली आहेत आणि आत्यांच्या मुलाला देण्यासाठी एक (ते नंतर दिले ), अशा तीन कुत्र्यांसाठी आई आता भाकरी बडवते म्हणून मला राग येतो . मी भावाला सारखी म्हणत असते ,"तुझी बायको आली कि एक दोन नाहीत तर हजार कुत्री पाळ पण आता नको "

 दुसरी घेऊ म्हैस , ह्या म्हैशीनी तर लहानपणापासून मला त्रास दिलाय . अगदी लहान होते तेव्हा सुट्टीत माझ्यावर अगदी भयंकरच प्रसंग ओढवून ठेवला होता . तर काय आहे --माझ्या आईकडे गावाला लागुनच एक अगदी शेत आहे ,शेरी म्हणत्यात त्या शेताला , दोन दोन शेऱ्या -खालची आणि वरची .दोन्ही शेऱ्या एका पानंदी ने विभागल्या होत्या . वरच्या बाजूला असणाऱ्या जे थोडे वर आणि उंच होते ती वरची शेरी ,मग पानंद आणि मग खाली खालची शेरी . खालच्या शेरीच्या बाजूने  ओढा व्हायचा , पाणी खूप होते तेव्हा त्या ओढ्यात म्हणून गावात कित्येक पूल बांधले (प्रत्येक गल्लीत एक) कारण ओढ्याच्या पलीकडे १/४ गाव आणि सगळी महत्वाची कार्यालये . शाळेत जायचे ,कचेरीत जायचे अजून हजार कामासाठी तिकडेच जायचे .पण पूल बांधल्यापासून ओढ्याचे पाणीच गेले . आता नुसत गारवेल आणि अक्क्या गावची गटार गंगाच वाहते . पावसाळ्यात मात्र पाणी असतेच . ते जावूदे पुलांची गोष्ट  .
 तर एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आमच्याकडे असणाऱ्या एका गड्याने -हणम्याने म्हैस नेऊन बांधली . खालच्या शेरीत वरच्या बाजूला खूपच मोठा बांध होता ,तिथे गवतच यायचे नुसते . मग एक खुंटा रोवून तिला लांब दोरीने बांधायची आणि मग ती गोलाकार परिसरात चरायची .
   हा तर तो सकाळी म्हैस बांधून आला . बाकीचे घरातली पुरष माणसे गेली इकडे -तिकडे (कामधंद्याला नाहीतर चकाट्या पिटायला ). संध्याकाळी," हणम्या  मेला म्हशीला घेवून आला नाही वाटत ",म्हणून आजी शिव्या देऊ लागली . पण एकही मुलगा जवळ नाही म्हणजे आजीचा मोहरा माझ्याकडे - "जा  ग तेवढी पळत पळत , म्हैस सोडून घेवून येशील का ?"  नाही ,आता रात्र झालीय … मी नाही असे म्हणू लागले . घरात ३ बायका -आई ,आजी आणि काकी पण त्या कशा जाणार -- खानदानी बायका रानात जात नाहीत … (ह्या खानदान नावाच्या राक्षसाने माझी पाट कधीच सोडली नाही पण ते नंतर ).
   मग शेवटी आजीने हजार गोष्टी सुनावल्या ,खायला देते आणि काय काय … शेवटी एकदाची तयार झाले . "राम राम ", म्हणत मी शेताचा रस्ता धरला ,पोटात भीतीचा गोळा उठला पण पर्याय काहीच नव्हता, गाव संपेपर्यंत काहीच वाटले नाही पण नंतर फारच भीती वाटू लागली , मग शेताजवळ असणाऱ्या घराजवळून परत महादेवाच्या देवळापर्यंत परत आले ,चुलत आजोबांनी मला पहिले आणि म्हणाले एवढ्या रात्रीची (म्हणजे ७ वाजता ) इकडे काय करत आहेस , सगळा वृत्तांत आजीच्या शिव्यांसकट सांगितला , आजोबांनी पण हणम्याला  चांगल्या दोन शिव्या हासडल्या आणि परत माझी वरात शेतावर … परत माझे राम राम चालू झाले ,आजोबांच्या लक्षात आले . "अगं इथं भुतं -खित नाहीत ,त्यासनी माहिती आहे ,बाळासाहेब असतोय फक्त इथ रात्रीचा मग जावून काय उपेग न्हाय ,तर घाबरू नगस पण तुला राम राम म्हणयच असेल तर निवांत म्हण ,असं कुत्रं मागं लागल्यागत नगो " , झाली म्हैस घरात आली ,आजोबांनी गोठयात बांधून सुशीला बाईंकडे (आजीकडे )मोर्चा वळवला ,सोप्यातून जोराची हाक ,"वाहिनी ssss "
आजी हातातला काम हातात ठेवून ,लगबगीन सोप्यात आली .
"हणम्या मेला असला तर मरू दे ,पण बाकीची पण मेलीत काय घरातली ? पोरगीला पाठीवलय शेरीत ते पण एवढ्या रात्तच "
आजी नुसतेच माझ्याकडे बघत ,"अहो ते … "
"मला काय बी सांगू नगा ,हिला उतरता येतंय व्हय वरच्या शेरीतन पांदित ?,पुन्हा हिला शेतात पाठीवलीसा तर याद राखा ,म्या दादांच्या संग बोलून म्हशीचा बाजार करायला सांगतो  "

आजोबा गेल्यावर आजीचा पट्टा चालू झाला …

नंतर कॉलेज जा जाताना मध्ये एका गावात सकाळी म्हशीच म्हशी सोडलेल्या असत, त्या डोंगराकडे चाललेल्या असत , निदान पंधरा मिनिटे तरी बसला थांबावे लागे . कितीतरी वेळा बसच्या हेडलाईट त्यांनी शिंगे घुसवून फोडलाय .

सगळ्यात भारी -- मी जेव्हा मुंबई अहमदाबाद ह्या हायवेवरून वापी ते दमन उप डाऊन करत असे ,त्या रस्त्यावर म्हशी -गवे आडवे येवून भारी भारी गाड्यांचा अक्सीडेंट झालेला मी पाहिलाय ,ओरखडाही पडलेला चालत नसलेल्या मालकांची तोंडे तेव्हा बघवत नसत .

अजून पण ह्या म्हशीनी माझा पिच्छा पुरवलाय ,रोजच ऑफिसच्या रस्त्यावर (पिंपळे -निलख ते बालेवाडी ) मध्ये नदीवर किंवा मिलेटरी च्या मैदानात चरायला नेत असावेत . अशा काही रस्त्यावर धुडगूस घालतात कि बास . एकदा अशाच चार पाच गाड्या थांबल्या ,मी पण मागे थांबले , चार चाकी वाले आत सुरक्षित . पुढे काय चाललंय याचा अंदाज येईना , एक एक गाडी निघाली ,मी पण निघणार एवढयात म्हैस माझ्या गाडीकडे पळत येत होती ,काय सुचेना ,आता नक्की शिंग खुपसणार आणि आपण मरणार असेच दृश्य डोळ्यासमोर आले . गुराखी मागून म्हशीला मारत पळत होता . मी जोरात ओरडले , म्हैस माझ्या गाडीच्या अगदी जवळ आली . गुराखी म्हशीला मारायचे थांबून माझ्यावर जोरात ओरडला ,"ओरडू नगा ,तुमच्याकडे येत नाही ती "

"अफझल खानसारखा कोतळा बाहेर आल्यावर ओरडणार कशी ?", सगळ माझ्या मनातच बोलले … आणि गाडीचा वेग वाढवला







आठवणी


कोंब ते कणीस कित्येक पदर
कोवळे ते जून चढती अस्तर
एकट्या दुकटया धरतात फेर
फुल ते निर्माल्य संपे सरणावर

सुखाची दुःखाची एकेक किनार
सुखाची मिरवते दिमाखात पदरावर
दुःखाची ठेवली कोंबून उरात
सुरकुत्या घड्या तीस हजार

सुखाच्या दुःखाच्या ह्या उतरंड्या 
ठेवल्या जपून मनात कांडया
मनाच्या तळाशी ठेवल्या बांधून
तरीही उलतात जखमा खांडून 

जगतात त्या सुखलेल्या पिंपळपानात 
फुलतात त्या मोरपिसात 
अडकतात त्या फोटोच्या चौकटीत 
चढतात त्या शेवटी भिंतीवर  

Sunday, April 26, 2015

कातरवेळ

का अशी ही कातरवेळ
निघेचना हा पळ
आसवे डोळ्यात हजर
चुकवून साऱ्यांची नजर

मन हे दोलायमान
रिते रिते हे भान
कालवा ना गोंगाट
तरीही भीती अफाट




डोह


खोल खोल अंतरंग
उठती हलकेच तरंग

निरव शांतता अढळ
न गाठता येई तळ

अस्तित्व त्याचे पाणी
सावल्यांची काळी जाळी

पाण्यास आकार तोच देई
पाण्याविना अस्तित्व काहीच नाही





कशी विसरू तुला ?



पाहून माझे छुमछुमते झुबे
स्मरण होते मजला तुझे
नसे तो वर्ण धमक पिवळा
मधूनच दिसतो  शुभ्र पांढरा

नसे तो आवाज किनरा
परी स्पर्श तो मऊ हसरा
नसे जपण्याची व्यर्थ काळजी
असे हजर नाजूक पाकळी

किती केल्या मी तुझ्या कुडया
कानात बसवल्या त्या बुगडया
दुमडून पाकळ्या केल्या अंगठया
रुतवून काटा बसवल्या फिरक्या

कशी विसरू मी चाफ्या तुला
बालपणीच्या ह्या गोड खुणा


चुका

आयुष्यात मी केल्या काही चुका
त्याचाच हा मार आहे मुका
दिसतात ना त्याच्या काही खाणाखुणा
पण लागल्या जिव्हारी ह्या वेदना

कळसूत्री बनवून गेल्या ह्या जीवना
नाचविती मला ह्या रात दिना
राहिल्या ना दोऱ्या माझ्या हाता
राहिला ना अंत माझ्या आकांता

तोडिले मी बंध ह्याच पाया
सुधारती ना तरी माझ्या आयुष्या
ठरविते मी नाही पुन्हा करायच्या
पण छळतात त्या जुन्या सावल्या

लावतात ह्या दृष्ट साऱ्या सुखा
तळ्यात मळ्यात मग न चुकता
दुख: आहेचि मग  साऱ्या जीवना
पुरवितील  पिच्छा अंतिम  समया


©ज्योती  पवार 

Tuesday, April 14, 2015

वाळवण

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीतले सगळ्यात नावडते काम असायचे ते म्हणजे घातलेल्या वाळवणावर लक्ष ठेवायचे . त्यातल्या त्यात धान्य वाळत टाकल असेल तर खूपच कंटाळवाणे वाटत होते .कंटाळवाण वाटायचं कारण म्हणजे एका जागेला बसून राहण्याचं .काठी आपटत राहण्याचं . थोडा वेळ बाकी मैत्रिणी काय करतात म्हणून फिरून यावे तर चालायचे नाही . कारण तोपर्यंत वाळवणात कुत्रं , डुक्कर यांनी कोणी तोंड घातलं तर मग काही खैर नसे .
    सगळ्यात मजेचा भाग धान्याची पाटी भरून दिली कि ती बाहेर नेहून ओतणे . त्यांचे मजेशीर ढीग बनवणे . ते पसरवणे . हातानेच त्यातून नक्षी काढणे . बाकी त्यातून चालून जाताना  होणाऱ्या गुदगुल्या अविस्मरणीय . गव्हाची तांबूस , जोंधळ्याची पिवळसर , तुरींची लालसर , हुलग्याची काळी छटा . मला नाही वाटत ह्या छटा कोणत्या रंगातून कागदावर उतरवता येत असतील . हौद , कणग्या झाडायला त्यात लहान असल्यामुळे लहानशी केरसुणी घेवून उतरायचे . आतून हौद झाडताना हौदाचा मारून आवाज करायचा . कोणीतरी उचलून अलगद आत सोडतानाची मजा खरच औरच होती . गोल गोल कणग्यातून त्यांना झाडताना त्या गोल फिरायच्या मग तर मज्जाच मज्जा .  अंगाला खाज सुटतीय म्हणून गार पाण्यात बराच वेळ पाण्यात खेळायला मज्जा यायची . पण उन्हात बघत बसायचे जीवावर यायचे, मग काहीतरी चांगले खायचे आमिष दाखवून बसवले जाई . चांगले म्हणजे काय तर चिरमुरे , फुटाणे , जांबळे , करवंद , कैऱ्या , गाजरे , भाजलेल्या पापड्या , पापड , गुळ शेंगा . कधीतरी पन्हे , लिंबाचे सरबत . चिंचेचा गोळा , फारतर फुकण्या (बॉबी पाच पैशाला एक मिळायची , चार आणे ), कधीतरी गारेगार , बर्फाचा गोळा किंवा खेळायला गजगे . पण त्यात स्वर्ग दिसायचा . एवढ्या आमिषावर दिवसभर काचा कवड्यांचा खेळ मांडून किंवा गजगे खेळायला बसायचे . संध्याकाळी पुन्हा ती वाळवणे काढताना आई सर्व चाळायला लागायची त्यात पण एक मज्जा . पण सांडलेले धान्य वेचताना …अबब नकोच हे असे वाटून जायचे .

सगळ्यात भारी वाळवण कुरडया, पापड्या, सांडगे, शेवया यांची . निम्म्या अधिक खावून संपवायचं  . सकाळी सकाळी उकळत्या पाण्यात आईने कुरडयाचा चिक घातला कि पांढराशुभ्र गोळा होईपर्यंत वाट बघायची की वाट्या घेवून शिजवलेला चिक खायला यायचं . आईची पाठ चिक हाटून भरून आलेली असायची आणि  आमची पिठ खाण्यासाठी घाई . मध्ये मध्ये लुडबुड नको म्हणून आई वाटीत पीठ घालून रिकामी व्हायची . आदीच फ्रॉकच्या ओठयात शेंगा घेवून यायच्या मग ते पीठ आणि शेंगा फस्त करायच्या . तांदळाचे सांडगे , शाबुच्या पापड्या तर वाळत घातल्या कि करपलेला सांडगा खाते ग म्हणत फस्त करत राहायचे . ज्वारीच्या पापड्या साडीवर घातल्या जायच्या  त्या संध्याकाळी शिडीवर उलट्या टाकायच्या वरून पाणी मारून मग हळूहळू सोडवून घ्यायच्या आणि त्यातल्या बऱ्याच तोंडात जायच्या . आईने गहू, ज्वारी भिजत घातल्यामुळे जो वास यायचा तो नको वाटायचा . पण एकदाका पीठ शिजायला पडलं की अगदी कधी एकदा पोटात जातंय असे व्हायचे .
   पापडाचे पीठ तर बाप रे टाळ्याला चिकटत मठ मठ गिळलं जायचं अक्षरशः . सांडगे करायचे असतील तेंव्हा तो तिखट आणि लसुन कोथीमबिरीचा
वास नाकात साठला जायचा . सकाळी लवकर पाटावर , मोठ्या पातेल्याच्या झाकण्यावर सांडगे तोडायचे . अगदी बारीक बारीक . पाच मुटके करून ते आदि पुजायचे . त्यात कांदा घालून डांगर करायचे आणि डांगर भाकरी खायची . दोनदिवस वाळताना सांडगे खायचे आणि दुसऱ्या दिवशी नवीन सांडग्याची भाजी आमटी . फणसाच्या बिया घालून सांडग्याची आमटी … लाजवाब . आता तोंडाला पाणी सुटले .

शेवया गहू वलव्हने ते त्याचा मैदा रवा वेगळा काढून … पाट मांडून … शेवया वळणे आणि ताटात गोल गोल चाळने … गल्लीतल्या बायकांचा गलका , चेष्टा , मस्करी . दुपारी मिळणारा सरबत . नुसत्या एक ग्लास सरबतासाठी दिवसभर शेवया चाळायच्या . सुंदर गोलगोल चाळले कि मिळणारी वाहवा . उन्हात घातलेले ताट न मोडता सुटे करणे .

एक एक गोष्ट आठवली की अजून मन बालपणात रमते आणि आईच्या कमरेचा काठा ढिला होवूनही वर्षभर काहीबाही खाता यावे म्हणून ती करत असे … हे आता कळतंय .