Sunday, October 18, 2015

उगाच चिंता …

स्थळ काशीद बीच
मी प्रेक्षक
आमचा सर्व ग्रुप समुद्रात खेळतोय, मी बसलेय पाहत अथांग समुद्र . शेजारीच थोड्या अंतरावर दोन मुले आणि दोन मुली . त्यांच्यात चाललेल्या संवादाची मी मूक प्रेक्षक . दोन बाटल्या (दारूच्या असाव्यात ).
दोन मुलींना उद्देशून एक मुलगा -- एक सिप तू पी एक सिप हि पिल .
दुसरी मुलगी : अरे कुछ नही होता है तू पी .
तिसरा मुलगा : मै कुछ नही बोलुंगा
परत पहिला मुलगा :अरे पी ना , उसमे कुछ बुरी बात नाही है
दुसरी मुलगी :मै तो पिवूंगी तू एक सिप ले पहिले
परत पहिला मुलगा ,चल तू एक  सिप  ,ये एक सिप
चवथी मुलगी : एक सिप
ते तिघे :हुर्रे
परत पहिला मुलगा : चल अभी एक एक सिप पी के खतम करो तुम दोनो
परत पहिला मुलगा :तू इसकी गर्लफ्रेंड है ना तो चल एक किस दे इसको फिर जा
परत दुसरी मुलगी ,(पिवून )मै तो इसको किस करूंगी
चवथी मुलगी अजून दोन चार सिप घेवून -बॉयफ्रेंडला कीस करून
दोघी एक बाटली संपवून समुद्रात
हे दोघे अजून एक बाटली पित बाहेर किनाऱ्यावर
त्या दोघी पाण्यात .

असं पहिल्यांदा पिवून ती मुलगी बाहेर येयील का याची मला उगाच चिंता … 
बाया २
   अनि तशी बुटकी पण दिसायला आणि बोलायला म्हणजे एकच नंबर . शिकली पण बीकॉम , कॉम्पुटर चे बेसिक कोर्स पण केलेले . घरची गरीब परिस्थिती . पण कधीही चेहऱ्यावर दिसून यायचे नाही इतकी खुश असायची . वडील वारले पण एकानेही चांगले स्थळ आणले नाही.  सर्व बिजवर स्थळे आणीत . तिच्यात एखाद्या मुलाला पटवायची हिम्मत नव्हती असे नाही पण ज्यांनी ज्यांनी तिच्यावर प्रेमाची नाटके केली ती फक्त तात्पुरती . फक्त वापर करून घेण्यासाठी .
   पण एखादे चांगले स्थळ आले किंवा कोणी आणले तर बाकी भावकीतले आमच्यात हे बसत नाहीत ते बसत नाहीत म्हणून नाकारायचे . कसेतरी एक मुलगा १२वी झालेलामुलगा  आला पास कि नापास तेही माहित नव्हते , तेंव्हा शेअर बाजार मध्ये मुंबईला सर्विसला आहे एवढीच माहिती . मुंबईत राहायचे म्हणजे किती पगार ? कोठे राहतो याची काहीच चौकशी केली नाही , आईने कर्ज काढून पोरीचे लग्न लावून दिले तसेही आईलाही फक्त लग्न उरकायचेच होते .
  शेअर बाजारात घोटाळा झाला आणि त्याची हजार बाराशेची नोकरीही गेली . बहिणीकडे राहायचा .
       नणंदेने पूर्ण उपयोग करून सर्विस गेल्यावर हिला गावाकडे हाकलले . मग तोपण गावाकडे आला . काहीच काम करायची सवय नाही . हिने कुठल्याशा पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम मिळवले . हा बेकारच . बेकारीत ह्याला काही उद्योग तर हवा ना ? मग दारू पिवू लागला . आता रोज दारू पिवून येतो आणि पोराला मारायला उठतो , कारण काय तर हे पोरग माझे नाही . संशय घेवून तिला मारतो , पोरालाही मारतो . रात्रभर पोराला खुशीत घेवून झोपते नाहीतर पोराला हा ठारच मारेल अशी भीती तिला वाटत असते. तिने धाडस करून घटस्फोटाचा निंर्णय घेत होती पण एकाही नातेवाईकाने तिला साथ दिली नाही . अगदी आईने सुद्धा . तू त्याला सोडतेस म्हणजे खरेच तुझे काहीतरी लफडे असेल असेच सर्व तिला म्हणतात . नवऱ्याच्या भयाने होती ती नोकरी सोडून दिली .
आता काहीच शिल्लक नाही , ना आत्मविश्वास , ना नोकरी.  आता दुसऱ्या नणंदेकडे घरगडी म्हणून राहते . ती नणंद पण हिच्यावर संशय घेते . आता लोक तिने नणंदेच्या नवऱ्याला कह्यात घेतले असे म्हणतात .

बाईला कोठेही जागा नाही हेच खरे .

बाया
   लक्ष्मी नवऱ्याने मारले म्हणून गावाला गेली खरी पण दोनच दिवसाने तिचा बाप तिला घेवून परत आला , दोन चार दिवस राहिला , लेकीच्या नान्न्यासाठी राहिला चार दिवस आणि जावयाला समजवुन परत गेला . पाचव्या दिवशी जावई लक्ष्मीचा पगार, स्वतःचा पगार घेवून मटका खेळायला गेला , अर्ध्या तासाने रिकाम्या हाताने परत आलालक्ष्मीने जाब विचारला , आता महिनाभर काय खायचे , पोराच्या शाळेची फी कशी भरायची ? पण तिच्या नवऱ्याकडे त्याचे उत्तर नव्हते . सर्व कपडे भरून अजून तिला मारून तो चालला गेला .
  आता लक्ष्मी रडत नाही , आई बापाला पण फोन करणार नाही म्हणाली , कोण नसतंय कुणाचे म्हणाली . माझं इथल्या पगारात भागतय म्हणाली . परत आलं तर मालकाला सांगून तेला हाकलून लावीन म्हणाली . कधी नव्हे ते मी सुखावले हे ऐकून ….


बाया 1

बाया

सकाळी सकाळी जोरजोरात कानडीत बोलल्याचा आवाज येत होता , पाठोपाठ पोरांच्या रडण्याचा . तसा तो आवाज नेहमीचाच आहे पण आज अजून जरा वेगळा कारण लक्ष्मीची पोरं आज रडत नव्हती तर तीच मोठमोठ्याने हंभरडा फोडून रडत होती पण कानाने ऐकण्यापेक्षा काहीच करू शकत नव्हते . तिला मारलेले फटक्यांचे सुद्धा आवाज ऐकू येत होते . प्रत्येक फटक्या सरशी अंगावर काटा येत होता , तिला किती लागले असेल ? प्रत्येक फटक्याने तिच्या मुलांचाही आवाज वाढायचा . हा आवाज सकाळी सकाळी येतोय म्हणजे लक्ष्मीचा नवरा दारू पिला नव्हता हे नक्कीच .

ऑफिसला जाताना लक्ष्मीचे डोळे सुजून टम्म झालेले पहिले . "सकाळी काय झाले ग ? " एवढेच विचारले तर तिचे उत्तर -

काय करू म्याडम , चार दिवस मला खूप ताप आलाय , काम होईना म्हणून ह्याला म्हणाले मला दवाखान्यात घेवून जा म्हणून एव्हढे मारत होता . पण मी आज गावाकडं जाणार आहे , पोराला बी शाळेत नाही लावले .

संपली कहाणी ? ताप संपला का नवीन परवड सुरु ?


काल लक्ष्मी सांगितल्याप्रमाणे गावाकडे  निघून गेली . रात्री पर्किंगमधल्या लाईट लागल्या नव्हत्या , जिन्यात पूर्ण अंधार होता . सकाळी पहाटे उठून तिचा खराटा वाजत नव्हता . सकाळी सव्वासाथला तिचे पार्किंग झाडून पुसून झालेले असते , पण आज तिचा नवरा साडेसाथ झाले तरी उठला नव्हता . मग कधी उठला काय माहित ? म्हणजे आजची तिची सर्व कामे त्याला करावी लागणार हे नक्कीच काल तिला मारून तिला जेवढा त्रास दिला त्याच्या कितीतरी पटीने ह्याला आज काम करावे लागणार ….

पण तो शांत निवांत, कारण एकच असावे - जावून जावून जाणार कोठे येयील चार दिवसाने परत हा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 

Sunday, October 11, 2015

सावध ह्या पुढच्या हाका !

बायकांच्या डोक्यात केमिकल लोचा नक्कीच असावा , खूप दिवस मनातच ठेवले पण आज सांगावेसेच वाटतेय. खुपदा मुलींचे असे असते  की एखाद्या मुलावर प्रेम जडते , मुलगी मनापासून करते , हळूहळू मुलगा तिला सांगायला लागतो - मला तू आवडतेस पण माझ्या घरच्यांना नाही पटणार . मग कोणीच सुखी होणार नसेल तर लग्न कशाला करायचे ? त्यापेक्षा आपण हे तुझ्या किंवा माझ्या  (कोणाचे आदी होईल तोपर्यंत) लग्नापर्यंत चालवत राहू , एकमेकांचे होवून राहू ,(तोपर्यंत मिळणारे फायदे मला मिळूदेत ) असे काहीतरी सांगून मुलींना झुलवत राहतात . मुलीही खुपदा अशी रिलेशन्स चालूच ठेवतात . मनाला समजावत नाहीत -- हे तात्पुरते आहे , तकलादू आहे  किंवा असे सर्व सांगणारी सिस्टीम आपल्याकडे नाहीच . हे मी सांगतीय कारण मी अशी बरीच उदाहरणे आजूबाजूला पाहते . मुलींचे मन मानायला तयारच नसते किंवा ध्यानात पण येत नाही त्यांच्या - ह्या सर्वात आपण स्वतःचे किती नुकसान करून घेतोय . इतक्या त्या मनाने गुंतलेल्या असतात . पुढे व्हायचे तेच  होते - मुले दुसरीशी लग्न करून सर्व विसरून जातात  , मुलीही दुसऱ्याशी लग्न करतात पण जुन्या आठवणींना कुरवाळत बसतात .

   माझा एक मित्र - एका  मुलीबरोबर त्याची तशी…  मैत्री . मैत्री का  काय ते ठावूक नाही पण … त्या मुलीची तो सर्व काळजी घेतो , घेवून फिरतो ,एकत्र  जेवतो , वाट पाहतो …  अजून बरेच काही असेलही पण लग्न -- नाही करणार . म्हणजे असेही नाही कि तो दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्न करणार नाही तर दुसऱ्या मुलीशी करणार पण हिच्याशी नाही …  का तर म्हणे त्याची आई फार कट्टर - जातीशी , मग लग्न नाही करू शकणार म्हणे … खुपदा सांगितले अरे आईला मनव की …. पण नाही - म्हणे ह्या लग्नाने जर कोणीच सुखी होणार नसेल तर कशाला करायचे . अरे हो पण मग तिला गुंतवून कशाला ठेवायचे ?( आणि तिने तरी का गुंतायचे? ), तिला तिचे आभाळ शोधू द्यावे ना -- पण नाही … ती माझीच असेल जोपर्यंत माझे किंवा तिचे लग्न होत नाही तोपर्यंत . तिची त्याच्याशी खूप इच्छा लग्न करण्याची पण त्याच्या घरी चालणार नाही … मग ही बिचारी प्रेम विसरू शकत नाही हे कारण सांगून स्वतःच्या मनाला फसवत राहिलीय . हे सर्व पचवण्यासाठी आहेच राधा कृष्णाचे उदाहरण . कृष्णाबरोबर म्हणे राधेचेच नाव घेतले जाते , रुक्मिणीचे नाहीच …  अरे पण राधेचे लक्षात ठेवले तुझे नाही हे कोण समजावणार ?

आपल्याकडे मुलींनी हे  सर्व पटवून देण्याची सिस्टीम नाही …मग दुःख करत बसायचे किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये जायचे , अभ्यास करिअर बंद . मुली खूप अभ्यास करतात चांगले मार्क्स पाडतात पण प्रेमवीराची लायकी नाही चांगले मार्क्स मिळत नाहीत मग ह्या त्याचे सर्व जर्नल्स , नोट्स साठी मदत करणार तोपर्यंत हे वीर सतत सोशल मिडीयावर पडीक (दुसऱ्या पोरींबरोबर गुलुगुलु गप्पा मारत )आणि ह्या राबणार …  स्वताची उन्नती रोखून, नेहमीच पडती बाजू मुलींची हेच जणू पटवून दिलेले असते त्यामुळे मुलीना बायकांना सवयच असते नमते घ्यायची .

आजकाल बायका -- ज्यांना घरात प्रेमाचे दोन चार शब्द मिळत नसतात त्याही अशा प्रेमविरासाठी वेड्या असतात , समोरचा पुरुष - मी तिला आधार देतोय ह्या गोंडस नावाखाली तिच्याकडून सर्व फायदे वसूल करत असतो  आणि ह्या बायका तो आपल्यावर किती प्रेम करतोय म्हणून …उतावळ्या असतात . जे बोलू नये ते बोलत असतात …  मागे हा वीर तिचे सर्व आंबट गोड मेसेज आपल्या मित्रांना फोरवर्ड करत असतो . बाईला ह्याचा पत्त्याच नसतो आणि वर सांगत असतो … बाईला अक्कल नको  हे सर्व करताना …? तिला पण ह्यात आनंद मिळतोय … मी तो तिला  देतोय… अरे हो पण चार चौघांना सांगून तो माणूस तिची चार माणसात इज्जत घालवतोय त्याचे काय ?

ह्या बायका मुली आडाणी नाहीतच - तर चांगल्या शिकल्या सावरलेल्या , कमावत्या  असले काहीच बिरुद चिटकवून त्यांना वेगळे करता येत नाही -- म्हणजे काहीतरी केमिकल लोचा आहे . कसा सावरावा तो? ? सावध ह्या पुढच्या हाका ऐकायला मदत करेल का ?