भराभर गवारीच्या शेंगा मोडत होते . ऑफिसला आज उशीर करायचाच नाही ह्या बेतानेच माझे हात चालत होते . एक एक काम आठवत
नजर घड्याळाकडे होती , इतक्यात फोन वाजला . सकाळी सकाळी नकोच घ्यायला . ह्या ऑफिस वाल्यांना
दमच नसतो ,म्हणून दुर्लक्ष केले तर परत खणखणला
. आता घेण्याशिवाय पर्यायच नव्हता . फोन ऑफिसचा नव्हता आणि घेतलाच
फोन घेतला आणि एकदम
सुन्न झाले . सर्व तसंच ठेवून साडी नेंसायला घेतली . आता साडी नेसून जाणं अपरिहार्य
होतं . वैताग नुसता . गाडीवर जाणे ते ही साडी नेसून मग अजून वैताग . नऊ -दहाचे उन्ह. "अधिक सुंदर, अधिक सुखी , अधिक समृद्ध", असे मोठ मोठे बोर्ड डोक्यात जायला लागले .
हळूहळू सुन्न मन विचार करायला लागले .
ताराताई , इनमिन खच्चून १५- २० किलोच काय असेल ते अस्तित्व . बाकी एक लुगड
आणि चोळी . वय असेल ८५ च्या आसपास , ते हि अंदाजाने मांडलेले . चिंचेच्या झाडाखाली एक खाट आणि त्यावर एक रग . एक
वाकळ . एवढेच . तरी जीव जायला दोन तीन दिवस गेले , काय राहिल्या असतील का अपेक्षा ?
काय राहिल्या असतील का इच्छा ? काय राहिल्या असे म्हणण्यापेक्षा
कोणत्या पूर्ण झाल्या ह्याचाच विचार जास्त करायला लागले .
१२- १३ वर्षाची असताना
ताराताय चे लग्न झाले ते ही तेवढ्याच वयाची तीन चार पोरं असणाऱ्या विधुराशी . सावळाच
वर्ण , धारदार नाक , उंचीपुरी ताराताय . तारुण्यात नक्कीच मदनाची अप्सरा असेल. बंडखोर
पण तितकीच . भावांना भावजायाना जशी बोलायची त्यावरून ती बंडखोर असणार हे नक्कीच . का
दिली असेल तिच्या वडिलानी तिला आपल्याच वयाच्या माणसाला ?
लग्न करून नवरा मिलेटरीत
दिल्लीला निघून गेला . पदर पण आला नव्हता तेंव्हा तिला . चार पोरांना खायला करून घालायला
आणून ठेवली घरात आणि निघून गेला . आणि दोन वर्षात टी बी ने खंगून परत आला . सेवा केली
दोन चार वर्षे जाग्यावर आणि मेला . पोरं कामधंद्या
साठी हीला हाकलून मुंबईला निघून गेली . आली परत माहेरात . तुझाही तिथे अधिकार आहे,
किमान भाकरी तुकडा तरी मिळवून खा हाय त्या जमिनीत असेही बाप म्हणाला नाही आणि पाठचे
चार भावूही म्हणाले नाहीत .
झाले ताराताय आता इथंच
राहणार हे पक्क. १२ पोरं झालेली म्हातारी अधिकच कृश मग म्हातारीला बसून काम नाही होत
तर तीच करी सर्व . पुढे मागे भावाचे लग्न झाले आणि ताराताय भावजयीवर तोंड टाकायची
. दुसरी आली , तिसरी आणि सर्व आल्यावर तायला कोण टुकडा पण दिना . शेवटी ताय आणि म्हातारी
दोघीच राहू लागल्या . शेजार पाजार कडून आमटी मागून आण , बाहेर असलेल्या पोरांकडून मिळालेल्या
पैशात चहा पावडर आणणे .काळा चहा पिणे असे सर्व चालू होते . म्हातारी गेल्यावर तायची
परिस्थिती अधिकच बिकट झाली , गप कोपऱ्यात बसून काही तुकडा मिळतोय का बघायची ताय , ते
ही डोळे पिंजारून . अजून बंडखोर होतीच ती , कधीतरी तिच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दातून
कळत असे पण कोणी काही बोलतही नसे आणि कोण विचारतही नसे . मग मुग गिळून गप्प बसण्याशिवाय
पर्याय च नव्हता तिला .
एक एक भावाचे लग्न
झाले , काय झाले असेल त्यांचा शृंगार फुलताना पाहून ? काय माझं नशीब म्हणून रडली असेल
का मनाने ? शरीराने कामेच्छ्याच्या ज्वाला फेकल्या असतील तेव्हा काय केले असेल ? किती
मन मारले असेल ? का असला काही विचारच आला नसेल तिच्यात ?
भावाच्या पोरांची लग्ने चालू झाली तेंव्हाच नवीन लुगडे मिळायला
लागले . नाहीतर दंड घातलेली लुगडीच तिची साथ देत होती . जग काय म्हणेल ह्या एवढ्या
एका विचारावरच तिला घरात जागा होती आणि झोपायला एक कोपरा .
मी गेले कि ताय ला एक
नोट मिळे मग ती कितीची असुदे १०० ची किंवा पाचशेची . ताय काहीच बोलत नसे . कडाकड बोटे
मोडी माझ्या तोंडावर हात फिरवून . माझी ज्योती तेवढी मायेची म्हणे . तुला नोट मिळते
म्हणून तुझा तिच्यावर जीव आहे असे तिला सारे चिडवत . पण तिचा आवाज वाढला की बाकी सारे
शांत . म्हणजे ती बंडखोर होतीच पण मग ह्या आख्ख्या तारुण्यासाठी ती का बंडखोर झाली
नसेल ?
शेवटी तिला डोळ्याने दिसायचे कमी झाले .
कोणी खायला घालीना तरीही सरावाने गावातनं परड्यात आणि तिथून माघारी असे करत
असे . कोणीच थारा देत नसे मग चिंचेच्या झाडाखाली
खाट मांडून एवढ्या थंडीत ती झोपत असे . चिंचेनेच तिला सहारा दिला .
मेल्यावर तिला तुकडाही न घालणाऱ्या भावजया गळा काढून रडत होत्या , माझ्या
हाताचा चहा घेतला ग , माझ्या हातच चहा पिला गंsss . मीही तुझी सारखी आठवण काढते असा
फोन येवूनही भेटायला गेले नाही . का गेले नाही ते कोणास ठावूक पण गेले नव्हते हेच खरे
. गेल्यावर ताराताय बोलत नव्हती . पिंजारल्या डोळ्याने माझ्याकडे बघत नव्हती का नोट
मिळेल ह्या आशेने माझ्याकडे पाहत नव्हती
मी आलेय ग भेटायला असे म्हणून ओरडून मन सांगत होते पण ताराताय
माझ्या पैशाकडे पाहत नव्हती .आया बाया शेवटची
अंघोळ घालण्यासाठी केस विंचारात होत्या , हेच हाथ पूर्वी कधी तिच्या डोक्यावरून फिरले
का नाहीत ? माहेरची नवी साडी घातली होती ,हीच नवीन साडी पूर्वी का तिला मिळाली नाही
? तिचा राग राग करणाऱ्या भावजया आता का गळा काढून रडत होत्या ?
"तुळशी वाणी जलम गेला " हे तिला त्यावेळी मिळालेलं
बिरुद तिला काय कामाचे होते ? ही हळहळ काय कामाची होती ?
सगळ्यात शिसारी आली ती , ती मेल्यावर तिच्या सावत्र पोरांना
फोन केला गेला , या तिला जाळायला म्हणून . तुमची आई मेलिय म्हणून . तिच्या मरण्यावर
पण तिचा सासरचा अधिकार होता . तिच कधी न
पाहिलेली नातू तिला जाळायला आले , शितोंडी धरायला आले . माहेरची पाहुणे म्हणून
फक्त बरोबर गेली . काय हे जीवन ?
ताराताय ,"नेली तुला कृष्णामायच्या घाटावर " अशी शिव्या
द्यायची , पण आज तीच स्वतः कृष्णा मायला भेटायला गेली कायमची .
तरीही एक प्रश्न आहेच , नियती इतकी क्रूर असू शकते ? आख्ख आयुष्य
असं फक्त भाकरीच्या तुकड्याच्या आशेवर काढता येते ?जन्म दिला म्हणून बाप आपल्या मुलीचे
संस्कार संस्कृतीच्या नावाने बलिदान देवू शकतो ?आपल्या आयुष्याची होळी होती आहे असे पाहून पण कोणी फक्त आपल्या भावांची , घराण्याची
किंमत राखण्यासाठी इतकी किंमत मोजू शकते ? का फक्त हि किंमत स्त्रियांनीच मोजायची असते
?
No comments:
Post a Comment