Monday, February 23, 2015

सोनुस पत्र

प्रिय सोनुस ,
    सोनू मी तुला जन्म दिलाय तो माझा आनंद म्हणून . माझ्या आनंदाच्या अनुभूतीचे तू प्रतिक आहेस .मला माहित आहे ,मला नाही जमले इतर आयांसारखे तुझ्यावर प्रेम करायला ,नाही जमले मला कौतुकाचे घास भरवायला आणि नाहीच जमले मला तुझ्यावर अभ्यास लादून तो तुझ्याकडून करवून घ्यायला . मी निश्चिंत होते तुला शाळेवर सोपवून ,तुझ्या शिक्षंका वर सोपवून .ते जे शिकवतील ते तू आनंदाने शिकशील आणि जे शिकशील ते फक्त तुझ्याच कुवतीचे असेल. माझी कुवत नाही लादत गेले मी तुझ्यावर , नाही मिसळली ती माझी कुवत तुझ्यात जबरदस्तीने .चुकले का  ग माझे ? तुझे अवकाश फक्त तुझेच असावे असे मला वाटत होते .ज्या कामात माझी खरोखरच गरज होती त्याच कामात तुला मदत करत राहिले . तुला अवघड वाटणाऱ्या म्याथस ,सायन्स च्या कोंसेप्त फक्त शिकवत गेले .माझ्या आई -बापाने बाराखडी -पाढे या शिवाय मला काहीच नाही शिकवले ,जे शिकवले ते माझ्या शिक्षकांनीच .पण मी माझ्या परीने शिकत गेले .म्हणूनच तुझ्या शैक्षणिक घोडदौडीत लुडबुड नको असे मला वाटत असते .मग मी या मुक्तांगणात सहजच सोडले . शाळेवर पूर्ण विश्वास ठेवून . क्लास ,ट्युशन मध्ये नुसते लिहूनच घेतात ह्या तुझ्या प्रतिक्रियेवर विश्वास ठेवून नंतर मी तुला क्लास ला जा असे कधीच बोलले नाही .तू रोज आपापल्या परीने करत आहेस . तुला पाठांतर नाही करता येत ,करत नाहीस ह्यावरही मी विश्वास ठेवला .तुझ्या चित्रकलेच्या प्रांगणात मी तुला तुझे चित्रांगण फुलवण्याची पूर्ण मुभा दिली .

   जमेल तशी ,लेख वाचून,माहिती मिळवून मी तुला सोप्या भाषेत पौगडावस्थेचि माहिती तुला समजावत गेले ,समाजावतेय . काय वाईट ,काय चुकीचे .स्पर्श ,लाज ,प्रेम यातले संबध आणि ज्ञान देत गेले ,देतेय . कपडेलत्ते ,शूज ,चपला ,सौदर्य प्रसाधने , मुलगी म्हणून जी काही हौस असते ती पूर्ण करत गेले ,करतेय . मैदानी खेळ खेळण्यास तुला आग्रह करत गेले .खेळण्यासाठी वेळ काढण्या साठी आग्रह करत आहे . मैत्रिणी मिळवणे ,त्या राखणे ,त्यांच्याबरोबर जमवून घ्यायला शिकवत गेले .

कधीतरी एखादा पदार्थ करण्याचा प्रयत्न कर असे सांगून -डाळ भात लावणे ,म्यागी बनवणे ,चहा बनवणे ,शेवटची चपाती लाटणे ,ओम्लेट बनवणे शिकवत गेले .कढी तशी जमली नाही पण काही हरकत नाही ..

पूर्वी मी मारत असे पण नंतर चूक समजून आल्यावर ते सर्व बंद करून तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे . अगदी मोकळेपणाने माझ्या आयुष्यावर बोलत गेले .त्याचाच परिणाम म्हणून तू खूपच छोटी असतानाच प्रौढ झालीस याचे मला नेहमीच वाईट वाटते . तुझ्या हट्टीपणाला माझा कधीच न पूर्ण झालेला हट्ट ह्या दृष्टीने पाहत गेले .

मी नाही देवू शकले तुला जास्त वेळ ह्या काळजीने मनात कुडते .पण तरीही तुझी लहानपणात स्वावलंबनाची वाटचाल पाहून सुखावत गेले .तुझ्या वागण्यावर विश्वास ठेवत इतरांकडे कोनाडोळा करतेय मी . भाजी आणणे ,अगदी लहान असल्यापासून स्वतच अंघोळ करणे ,खिडक्या पुसणे ,छोटे छोटे सामान आणणे ,कपड्यांच्या घड्या घालणे ,कधीतरी घरासफाईत मदत करणे ,ताट वाढून घेणे ह्या गोष्टी शिकवत गेले आणि तुला हे सर्व करताना पाहून सुखावत गेले .तुझ्या आवडीवर ,आवडीने केलेल्या पसाऱ्यात मोरपिसारा फुलवत गेले .वाईट वाटते ग मला त्या पसाऱ्याचे ,इतस्तत पडलेल्या सामानाचे पण उद्याची सोनू यातूनच फुलणार आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून खुश होत गेले .

   लोक मला तुझ्या आभ्यासाबद्दल विचारतात तेव्हा तुझ्या अभ्यासाच्या प्रगती पेक्षा इतर चांगल्या गुणाचे कौतुक करते पण तुझी अभ्यासातली खरी प्रगतीही सांगत गेले .पूर्वी नव्हती तुला आवडत मी जास्त पुस्तके वाचलेली,पण आजकाल तू हि इंग्लिश का होईना पण पुस्तके घेत आहेस ,वाचत आहेस ..हेच कमी नाही माझ्यासाठी .तू वाढदिवसाला ड्रेस आणि पार्टी ऐवजी बुक्स मगितलिस तेव्हा स्वर्ग दोनच बोटे उरला होता मला .

तुझी चित्रकलेची बक्षिसं पाहून मी खूप सुखावले पण तरीही वाईट वाटलेच मला तुझे मराठी कविता पाठांतर च्या स्पर्धेत सिलेक्शन नाही झाले तेव्हा कारण तेव्हा तू नवीन कविता मागितली होतीस माझ्या फेबु मित्र मैत्रींनिकडून  . कविता मोकाशी कडून  घेवून जेव्हा मी ती तुला दिली तेव्हा --"चांदण्या कुजबुजल्या " असे सारखे म्हणत गोड हास्य देत होतीस मला आणि तिला 'थान्क्स' म्हण ग अशी धमकीच दिली होतीस तू मला आणि तरीही विसरलेच होते मी तिला थान्क्स म्हणायला .पण आज या पत्राच्या निमित्ताने सांगते ग तिला थान्क्स म्हणून .

माझ्या आवडत्या जुन्या गाण्यांना जेव्हा तू गुणगुणतेस तेव्हा मला मिळतो एक सुखद गारवा .सुखावते मी जेव्हा तू माझे अश्रू पुसतेस आणि म्हणतेस -आय डोंट लाईक माय रोत्ल्लू ममा "


    पण तरीही रुततो मला तुझा आगवूपणाचा एखादा शब्द ,तरीही खुपते मला तुझी अभ्यासातली प्रगती .तरीही रुततोच मला तुझा कधीकधी केलेला वेड हट्ट ,तू अन्द्रोइद मोबाईल चा केलेला हट्ट .रुततेच मला तुझे म्याथ्ला तिरस्कार करणे ,माझ्या वेडेपणावर हसणे ,अस्ताव्यस्त होणे ,पसारा करणे .पण दाबून ठेवते मी सर्व -फक्त तुझ्याचसाठी .

No comments:

Post a Comment