Tuesday, April 14, 2015

वाळवण

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीतले सगळ्यात नावडते काम असायचे ते म्हणजे घातलेल्या वाळवणावर लक्ष ठेवायचे . त्यातल्या त्यात धान्य वाळत टाकल असेल तर खूपच कंटाळवाणे वाटत होते .कंटाळवाण वाटायचं कारण म्हणजे एका जागेला बसून राहण्याचं .काठी आपटत राहण्याचं . थोडा वेळ बाकी मैत्रिणी काय करतात म्हणून फिरून यावे तर चालायचे नाही . कारण तोपर्यंत वाळवणात कुत्रं , डुक्कर यांनी कोणी तोंड घातलं तर मग काही खैर नसे .
    सगळ्यात मजेचा भाग धान्याची पाटी भरून दिली कि ती बाहेर नेहून ओतणे . त्यांचे मजेशीर ढीग बनवणे . ते पसरवणे . हातानेच त्यातून नक्षी काढणे . बाकी त्यातून चालून जाताना  होणाऱ्या गुदगुल्या अविस्मरणीय . गव्हाची तांबूस , जोंधळ्याची पिवळसर , तुरींची लालसर , हुलग्याची काळी छटा . मला नाही वाटत ह्या छटा कोणत्या रंगातून कागदावर उतरवता येत असतील . हौद , कणग्या झाडायला त्यात लहान असल्यामुळे लहानशी केरसुणी घेवून उतरायचे . आतून हौद झाडताना हौदाचा मारून आवाज करायचा . कोणीतरी उचलून अलगद आत सोडतानाची मजा खरच औरच होती . गोल गोल कणग्यातून त्यांना झाडताना त्या गोल फिरायच्या मग तर मज्जाच मज्जा .  अंगाला खाज सुटतीय म्हणून गार पाण्यात बराच वेळ पाण्यात खेळायला मज्जा यायची . पण उन्हात बघत बसायचे जीवावर यायचे, मग काहीतरी चांगले खायचे आमिष दाखवून बसवले जाई . चांगले म्हणजे काय तर चिरमुरे , फुटाणे , जांबळे , करवंद , कैऱ्या , गाजरे , भाजलेल्या पापड्या , पापड , गुळ शेंगा . कधीतरी पन्हे , लिंबाचे सरबत . चिंचेचा गोळा , फारतर फुकण्या (बॉबी पाच पैशाला एक मिळायची , चार आणे ), कधीतरी गारेगार , बर्फाचा गोळा किंवा खेळायला गजगे . पण त्यात स्वर्ग दिसायचा . एवढ्या आमिषावर दिवसभर काचा कवड्यांचा खेळ मांडून किंवा गजगे खेळायला बसायचे . संध्याकाळी पुन्हा ती वाळवणे काढताना आई सर्व चाळायला लागायची त्यात पण एक मज्जा . पण सांडलेले धान्य वेचताना …अबब नकोच हे असे वाटून जायचे .

सगळ्यात भारी वाळवण कुरडया, पापड्या, सांडगे, शेवया यांची . निम्म्या अधिक खावून संपवायचं  . सकाळी सकाळी उकळत्या पाण्यात आईने कुरडयाचा चिक घातला कि पांढराशुभ्र गोळा होईपर्यंत वाट बघायची की वाट्या घेवून शिजवलेला चिक खायला यायचं . आईची पाठ चिक हाटून भरून आलेली असायची आणि  आमची पिठ खाण्यासाठी घाई . मध्ये मध्ये लुडबुड नको म्हणून आई वाटीत पीठ घालून रिकामी व्हायची . आदीच फ्रॉकच्या ओठयात शेंगा घेवून यायच्या मग ते पीठ आणि शेंगा फस्त करायच्या . तांदळाचे सांडगे , शाबुच्या पापड्या तर वाळत घातल्या कि करपलेला सांडगा खाते ग म्हणत फस्त करत राहायचे . ज्वारीच्या पापड्या साडीवर घातल्या जायच्या  त्या संध्याकाळी शिडीवर उलट्या टाकायच्या वरून पाणी मारून मग हळूहळू सोडवून घ्यायच्या आणि त्यातल्या बऱ्याच तोंडात जायच्या . आईने गहू, ज्वारी भिजत घातल्यामुळे जो वास यायचा तो नको वाटायचा . पण एकदाका पीठ शिजायला पडलं की अगदी कधी एकदा पोटात जातंय असे व्हायचे .
   पापडाचे पीठ तर बाप रे टाळ्याला चिकटत मठ मठ गिळलं जायचं अक्षरशः . सांडगे करायचे असतील तेंव्हा तो तिखट आणि लसुन कोथीमबिरीचा
वास नाकात साठला जायचा . सकाळी लवकर पाटावर , मोठ्या पातेल्याच्या झाकण्यावर सांडगे तोडायचे . अगदी बारीक बारीक . पाच मुटके करून ते आदि पुजायचे . त्यात कांदा घालून डांगर करायचे आणि डांगर भाकरी खायची . दोनदिवस वाळताना सांडगे खायचे आणि दुसऱ्या दिवशी नवीन सांडग्याची भाजी आमटी . फणसाच्या बिया घालून सांडग्याची आमटी … लाजवाब . आता तोंडाला पाणी सुटले .

शेवया गहू वलव्हने ते त्याचा मैदा रवा वेगळा काढून … पाट मांडून … शेवया वळणे आणि ताटात गोल गोल चाळने … गल्लीतल्या बायकांचा गलका , चेष्टा , मस्करी . दुपारी मिळणारा सरबत . नुसत्या एक ग्लास सरबतासाठी दिवसभर शेवया चाळायच्या . सुंदर गोलगोल चाळले कि मिळणारी वाहवा . उन्हात घातलेले ताट न मोडता सुटे करणे .

एक एक गोष्ट आठवली की अजून मन बालपणात रमते आणि आईच्या कमरेचा काठा ढिला होवूनही वर्षभर काहीबाही खाता यावे म्हणून ती करत असे … हे आता कळतंय .

No comments:

Post a Comment